कोलंबो । गालेच्या पहिल्या कसोटीत मोठा विजय मिळवल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसरीकडे दारुण पराभवानंतर यजमान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे कोलंबोत सुरू होणार्या दुसर्या कसोटीत भारतीय संघाचे पारडे जड असले तरी सलामीच्या जोडीचा प्रश्न कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री कसा सोडवतायेत याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसर्या सामना जिंकून मालिका विजय साजरा करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. राहुल लोकेश ऐनवेळी आजारी पडल्यामुळे ध्यानीमनी नसताना पडल्यामुळे सुट्टीची मजा लुटण्याच्या तयारीत असणार्या शिखर धवनला संघात स्थान मिळाले. फॉर्मात नसलेल्या धवनने शतक ठोकत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. त्याचवेळी मुकुंद अभिनवने दुसर्या डावात 81 धावा करत छाप पाडली. आता राहुल लोकेश आजारपणातून सावरलेला आहे. त्यामुळे सलामीच्या जोडीसाठी एकाला संघाबाहेर बसवण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाला घ्यावा लागेल. राहुलला संघात स्थान मिळाल्यास अभिनव मुकुंदला बाहेर बसावे लागेल. शिखर धवनच्या फलंदाजीत सातत्य नसले तरी सामना जिंकून देण्याची क्षमता ही त्याची जमेची बाजू आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्याने केवळ 10 षटकेचा टाकली होती. आणखी काही वेगळ्या कारणास्तव कोहली त्याला संघात ठेवू शकतो. खेळपट्टी संथ असल्यास कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकते. पण सध्यातरी हार्दिक संघातले स्थान पक्के आहे.
पहिल्या सामन्यातील मोठ्या पराभवामुळे श्रीलंकेला दुसर्या सामन्यासाठी संघात मोठे बदल करावे लागतील. न्युमोनिया झाल्यामुळे पहिली कसोटी खेळू न शकलेला दिनेश चंडीमल कर्णधार म्हणून संघात परतला आहे. लाहिरु थिरीमानेला पुन्हा बोलावले असल्यामुळे अंगठ्याला फ्रॅक्चर झालेल्या असेला गुणरत्नेच्या जागेवर त्याला संघात स्थान मिळेल. पाठीच्या दुखण्यामुळे पहिल्या सामन्यात खेळू न शकलेला सुरंगा लकमल या सामन्यातही न खेळण्याची शक्यता आहे. यजमानांना संघात समतोल राखवा लागणार आहे. फिरकी गोलंदाज मलिंदा पुष्पकुमार आणि लक्शन संदीकनला अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
भारत
शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, वृद्धिमान सहा, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद शमी
श्रीलंका
दिमुथ करुणारत्ने, उपुल थरंगा, कुसाल मेंडिस, दिनेश चंडीमल, अँजेलो मॅथ्यूज, लाहिरु थिरीमाने, निरोशन डिक्वेल्ला, दिलरुवान परेरा, रंगना हेरथ, नुवान प्रदीप, लाहिरु कुमारा.
पुजाराचे कसोटी सामन्यांचे अर्धशतक
श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी सुरू होणारा कोलंबो कसोटी सामना हा चेतेश्वर पुजाराचा 50 वा कसोटी सामना असेल. कसोटी सामन्यांचे अर्धशतक गाठणारा तो भारताचा 31 वा क्रिकेटपटू आहे. गॉलेमध्ये खेळलेल्या पहिल्या कसोटीत रविंचंद्रन अश्विनने हा पल्ला पार केला होता. पुजाराने 2010 मध्ये बंगळुरूत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात पुजाराने 89 चेंडूत 72 धावा करत भारताला विजय मिळवून दिला होता. राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर पुजारा तिसर्या क्रमांकासाठी भारताचा महत्वाचा फलंदाज झाला आहे. गॉलमधील कसोटी त्याने 153 धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. कसोटी क्रिकेटला उपयोगी अशी पुजाराची फलंदाजीची शैली आहे. याबाबतीत त्याची नेहमीच राहुल द्रविडशी तुलना केली जाते. 25 जानेवारी 1988 रोजी जन्मलेल्या पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 49 सामन्यांतून 52.18 च्या चांगल्या सरासरीने 12 शतके आणि 15 अर्धशतकांसह 3966 धावा केल्या आहेत. पुजाराने आतापर्यंत केवळ पाचच एकदिवसीय सामने खेळलेले आहेत.