भारताचे मनोज, मनीष, सतीशही अंतिम फेरीत

0

प्राग्वे । झेक प्रजासत्ताकमध्ये सुरु असलेल्या ग्रां प्रि युस्टी नाद लेबम आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी दणकेबाज कामिगिरी केली आहे. भारताच्या मनोजकुमारने 69 किलो वजन गटात, सतिशकुमारने 91 किलोवरील वजन गटात तर मनिष पनवारने 81 किलो वजन गटात अंतिम फेरी धडक मारली आहे. 91 किलोवरील गटातील उपांत्य लढतीत सतिशकुमारने झेक प्रजासत्ताकच्या ऍडॅम कोलेरीकचा पराभव केला. मनिष पनवालने 81 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत झेकच्या हॅलेडीकायचा पराभव केला. 69 किलो वजन गटात मनोजकुमारने ख्रिस्टेन चोलीनस्कायवर मात करत अंतिम फेरी गाठली.

आशीषकुमारचा हेरुटेनेनकडून पराभव
भारताच्या आशिषकुमारला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जर्मनीच्या हेरुटेनेनकडून पराभव पत्करावा लागला. 60 किलो वजन गटात भारताच्या शिवा थापानेही आधीच अंतिम फेरी गाठली आहे. शिवा थापाने यापूर्वी विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते. शिवा थापाने झेक प्रजासत्ताकमधील या स्पर्धेत झेकच्या हुलेव्हवर एकतर्फी विजय मिळविला तर भारताच्याच गौरव बिदुरीला 52 किलो वजन गटात उपांत्य फेरीत पुढे चाल मिळाली. भारताच्या 5 स्पर्धकांनी या स्पर्धेतील आपली किमान रौप्यपदके निश्चित केली आहेत.

विश्‍व मुष्टियुद्ध स्पर्धेपूर्वीची पात्रतेची स्पर्धा
जर्मनीत 25 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार्‍या विश्‍व मुष्टीयुद्ध स्पर्धेपूर्वीची झेकमधील स्पर्धा पात्रतेची म्हणून ओळखली जाते. या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे अमित, कविंदर, गौरव, शिवा थापा, मनोजकुमार, सुमित आणि सतिशकुमार हे पात्र ठरले आहेत. तसेच 75 किलो वजन गटातून विकास कृष्णनने या स्पर्धेसाठी तिकीट मिळविले आहे.