भारताच्या खात्यात तिसरं पदक; लव्हलिनाला बॉक्सिंगमध्ये कांस्य

टोक्यो : भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन आज ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं. सुवर्णपदकापासून अवघे दोन विजय दूर असणाऱ्या लव्हलिनाचा उपांत्य फेरीत पराभव झाला. उपांत्य फेरीत जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीने लव्हलिनाला ५-० ने पराभूत केलं. लव्हलिनाविरोधात खेळताना बुसेनाझ सुर्मेनेली फारच आक्रामक पद्धतीने खेळल्याने लव्हलिना पराभूत झाली. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय बॉक्सर बनली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे. आसामच्या २३ वर्षीय लव्हलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

लव्हलिनावर संपुर्ण देशात कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लव्हलिनाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “लव्हलिना बोर्गोहेन खूप चांगली लढलीस. बॉक्सिंग रिंगमधील तुमचं यश अनेक भारतीयांना प्रेरणा देते. तुमचा दृढनिश्चय आणि संकल्प प्रशंसनीय आहे. कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. भविष्यासाठी अनेक शुभेच्छा.”

रेकॉर्ड बूकमध्ये लव्हलिना

लव्हलिनाने कांस्यपदकावर आपलं नाव कोरताना काही खास विक्रम केलेत. बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. तर ईशान्य भारतामधील राज्यांमधून आलेली आणि ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती तिसरी महिला आहे. तसेच बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरलीय. विजेंदर सिंग आणि एम. सी. मेरी कोम यांच्यानंतर पदक जिंकणारी लव्हलिना ही तिसरी भारतीय बॉक्सिंगपटू ठरलीय. २०१९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बुसेनाझने सुवर्ण मिळवले होते, तर लव्हलिना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदाही लव्हलिनाला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे.

वडिलांनीच पाहिला नाही सामना

एकीकडे लव्हलिना पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक आणले या आशेने सर्व भारतीय या सामन्याकडे नजर लावून बसलेले असतानाच दुसरीकडे लव्हलिनाच्या वडिलांनी मात्र हा सामना लाइव्ह पाहिला नाही. मणिपूरमध्ये राहणाऱ्या टीकेन यांनी लव्हलिनाचा सामना लाइव्ह पाहिला नाही. अनेक भारतीय हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी सकाळपासूनच उत्सुक होते. मात्र टिकेन यांनी हा सामना पाहणार नसल्याचं आधीच जाहीर केलं होतं. इतकच काय त्यांनी आपल्या घरातील डीटीएचसुद्धा रिचार्ज केलं नव्हतं. “मी खूप आनंदी आहे. ती तिचं स्वप्न साकार करणार आहे. तिला आयुष्यामध्ये हेच करायचं होतं. आसाममधील लोकांकडून मिळत असणाऱ्या पाठिंब्यासाठी मी त्यांचा आभारी आहे,” असं टिकेन यांनी सामना सुरु होण्यापूर्वी म्हटलं होतं.