भारतीय संघराज्याच्या अतिमहत्त्वाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी डॉ. निर्मला सीतारामन या उच्चविद्याविभूषित आणि सक्षम महिलेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे, याचे स्वागत करावेसे वाटते! यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस आणि मनोहर पर्रीकर अशा मराठी भाषक व्यक्तींप्रमाणे नितीन गडकरी यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली असती, तर अधिक आनंद झाला असता असे कुणाही मराठी माणसाला वाटणे स्वाभाविक असले तरी इथे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की, संरक्षण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून यापूर्वीच्या नेहरू – शास्त्री – इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात जसे डी. आर उर्फ आनंदराव चव्हाण होते तसे आताच्या मंत्रिमंडळात, धुळ्याचे विख्यात सर्जन डॉ. सुभाष रामराव भामरे हे मराठी भाषक राज्यमंत्री आहेत! असो. डॉ. निर्मला सीतारामन यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959चा, तामीळनाडूमधल्या तिरुचिरापल्ली इथल्या अय्यंगार ब्राह्मण कुटुंबातला! मातृभाषा तामीळ! वडील नारायण सीतारामन हे रेल्वेत नोकरीला असल्याने त्यांचे बालपण अनेक ठिकाणी गेले. शालेय शिक्षण मद्रास येथे आणि पुढील शिक्षण त्रिची येथे झाले. एमए अर्थशास्त्र झाल्यावर त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये भारत आणि युरोप यामधील वस्रोद्योग या विषयात संशोधन – अध्ययन करून पी. एचडी ( डॉक्टरेट ) मिळवली.
जेएनयूमध्ये असतानाच त्यांची मैत्री त्यांचे सहाध्यायी परक्कल प्रभाकर या तैलबुद्धीच्या तेलुगु भाषक तरुणाशी झाली. पुढे ते एकमेकांशी विवाहबद्ध झाले आणि लंडनला निघून गेले. पी. प्रभाकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अंड पोलिटिकल सायन्स या जगद्विख्यात उच्च-शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून पुढे तिथूनही पी. एचडी. प्राप्त केली. दरम्यानच्या काळात निर्मला सीतारामन यांनी अर्थार्जनासाठी लंडनमध्ये अर्धवेळ – पूर्णवेळ , जसे मिळेल तसे काम केले. बीबीसीच्या कचेरीत जसे केले तसे लंडन शहरातल्याऑक्सफर्ड स्ट्रीटवरच्या करलळींरीं या गृहसजावटीच्या वस्तूंची आणि फर्निचरची विक्री करणार्या भल्यामोठ्या स्टोअरमध्ये सेल्स काउंटर सांभाळणारी सेल्स गर्ल म्हणूनही काम केले! पुढे, लंडनमधल्याच ’ प्राईस वॉटरहाऊस ’ या उद्योगसमूहाच्या कचेरीत चरीज्ञशीं -परश्रूीीं म्हणून त्या काम पाहू लागल्या असतानाच त्यांच्या पतीराजांचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यांनाही आई होण्याची ओढ लागली. त्या दोघांनी मायभूमीला परतण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या कन्येचे नामकरण त्यांनी वाङ्मयी असे केले! निर्मला या मनाने कणखर असल्या तरी वृत्तीने भाविक आहेत, त्या कृष्णभक्त आहेत. कृष्णभक्तीपर संगीत त्यांना विशेष आवडते. एकूण निर्मला सीतारामन् यांच्या सासरचे वातावरण जरी काँग्रेसमय होते तरी ते समाजकारण आणि राजकारण करण्यास अनुकूल होते.
-प्रवीण कारखानीस
9860649127