भारताच्या प्रयत्नांना यश; कुलभूषण जाधवांबाबतचा विधेयकाला पाकिस्तान संसदेत मंजुरी

0

नवी दिल्ली: हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव शिक्षेच्या समीक्षेसाठी पाकिस्तानच्या संसदेत विधेयक मंजूर करण्यात आले आहे. भारत सरकारकडून याबाबत अनेक प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (समिक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश, असे या विधेयकाचे नाव आहे. या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेत (नॅशनल असेंब्ली) विरोधकांचा मोठा विरोध असतानाही कायदा आणि न्यायसंबंधी स्थायी समितीने चर्चा करुन मंजुरी दिली.

हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांखाली ५० वर्षीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्य कोर्टानं एप्रिल २०१७ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. भारताने पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाच्या निर्णयाविरोधात आणि जाधव यांना कॉन्सुलेट अॅक्सेस (परराष्ट्रातील कायदेशीर मदत) देण्यास नकार देण्याविरोधात २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.

हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने जुलै २०१९ मध्ये दिलेल्या निर्णयात पाकिस्तानने जाधव यांच्या शिक्षेबाबत समिक्षा आणि पुनर्विचार करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर कोर्टाने भारताला विनाविलंब जाधव यांच्यापर्यंत कायदेशीर मदत पोहोचवण्याचे आदेश दिले होते.