भारताच्या शत्रूंवर इस्त्रोच्या 13 उपग्रहांद्वारे होतेय निगराणी

0

नवी दिल्ली। भारतावर वाईट नजर ठेवणार्‍यांवर आता इस्त्रोचे 13 उपग्रह आकाशातून नजर ठेवून त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करण्यास लष्कराला मदत करणार आहेत. केवळ जमिनीवरच नव्हे, तर आकाशातही उपग्रहांची टेहळणी असणार आहे. अवकाशात तैनात असलेले 13 उपग्रहांमध्ये कार्टोसेट श्रेणी-2 चे उपग्रहही असणार आहेत. त्यांचे नियंत्रण रिमोटद्वारे केले जाणार आहे. पृथ्वीपासून जवळ जवळ 200 ते 1200 किलोमीटर उंचीवर ते उपग्रह स्थिर आहेत.

काश्मीर सीमेवरही नजर
काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी हालचाली ते अचूक टिपणार आहेत. कार्टोसेट-2,
कार्टोसेट-1, रीसेट-1 आणि रीसेट-2 उपग्रहांच्या मदतीनेही भारतीय लष्कर लक्ष ठेवणार आहे. भारतीय नौदल जी-सॅटद्वारे लक्ष ठेवून युद्ध नौका, पाणबुड्या आणि विमाने सक्रिय करणार आहे. आपल्या शत्रूंविरोधात भारत उपग्रहविरोधी अस्त्रांचा वापर करण्यासही सक्षम आहे. अशी यंत्रणा केवळ रशिया, अमेरिका आणि चीन यांच्याजवळच आहे.

तंत्रज्ञान केंद्रित युद्धांचे युग
संरक्षण संशोधन विकास संघटनेचे माजी संचालक आणि संरक्षण तंत्रज्ञान तज्ज्ञ रवी गुप्ता याविषयी पूरक माहिती देतात. लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र अग्नीच्या तांत्रिक सामर्थ्यात बदल करण्यात आले आहेत. उपग्रह सोडण्याच्या यंत्रणा हे अग्नी जोडता येऊ शकते, असे गुप्ता सांगतात. पारंपरिक युद्धपद्धती आता कालबाह्य झाल्या आहेत. आता तंत्रज्ञान केंद्रित युद्धांचे युग आहे. लष्कर, नौदल, हवाईदलांना दूर असलेल्या शत्रूंबाबत सूचना मिळतात आणि त्यानुसार संरक्षण साधने शत्रूंंवर हल्ला करतात, अशी ही पद्धत आहे. भारताने यात प्रगती केलेली आहे.