भारताच्या संरक्षण विषयक धोरणात होणार बदल- राजनाथ सिंह

0

नवी दिल्ली– भारताच्या संरक्षण विषयक धोरणांमध्ये येत्या काळात बदल होण्याची शक्यता असल्याचे संकेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेे आहे. अण्वस्त्रांच्या वापराबाबत भारताने ‘नो फर्स्ट युज’ अर्थात पहिल्यांदा वापर करायचा नाही, हे धोरण अवलंबले आहे. मात्र, भविष्यात यामध्ये बदल होऊ शकतो, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. शुक्रवारी पोखरण येथे माध्यमांशी बोलताना राजनाथ सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आजपर्यंत आपले अण्वस्त्र धोरण हे ‘नो फर्स्ट युज’ असे राहिले आहे. मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. दरम्यान, याबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे. त्या ते म्हणातात, पोखरण ही अशी जागा आहे ज्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला आण्विक शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली. तसेच यावेळी त्यांनी ‘नो फर्स्ट युज’ हे तत्वही निश्चित केले. भारत या तत्वाचे कसोशीने पालन करीत आहे मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहिल.
भारताने अण्वस्त्रधारक देश म्हणून आपली ओळख निर्माण केली असून ही देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे.
भारताने 1998 मध्ये पहिल्यांदा यशस्वी अणू चाचणी केली, त्यामुळे भारताने अण्वस्त्रधारक देशांच्या यादीत स्थान मिळवले. त्यावेळी भारताने कोणत्याही देशाविरोधात पहिल्यांदा अणस्त्राचा वापर करायचा नाही असे ‘नो फस्ट युज’ धोरण अवलंबले होते असेही ते म्हणाले.