डीबीएस, स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे केला वसुलीचा दावा
मुंबई | ‘फॉर्च्युन’ने भारतातील 500 आघाडीच्या कंपनींच्या यादीत खाद्य, कृषी व प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील एक नंबरचा दर्जा दिलेली ‘रुची सोया’ कंपनी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. डीबीएस आणि स्टॅन्डर्ड चार्टर्ड या दोन बँकांनी शुक्रवारी ‘रुची सोया’विरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) दावा दाखल केला आहे. या कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करावी, अशी विनंती या बँकांनी केली आहे. ‘रुची सोया’वर तब्बल 12 हजार 232 कोटींचे कर्ज थकले आहे. कर्जाची ही रक्कम कंपनीच्या एकूण भांडवलाच्या तब्बल 12 पट आहे.
‘फॉर्च्युन’च्या ‘भारत 500’ यादीत रुची सोया ही कंपनी 83 वयां स्थानी होती. या अव्वल भारतीय कंपन्यांच्या यादीत पहिल्या शंभरात स्थान पटकावलेली ही कृषी क्षेत्रातील एकमेव कंपनी ठरली होती. 2015-16 या आर्थिक वर्षातील कामागिरीवरूनच ही कंपनी अडचणीत आल्याचे स्पष्ट होत होते. या वर्षात कंपनीचे नुकसान तब्बल 87 हजार 870 कोटींवर पोहोचले होते. कर जोडल्यास नुकसानीचा हा आकडा 90 हजार 95 कोटींवर पोहोचला होता. त्यामुळेच गेल्या वर्षी सिंगापूरमध्ये अदानी विल्मर आणि रुची सोया यांच्यात करार झाला तेव्हाच ही कंपनी दिवाळखोरीतून ‘अदानी विल्मर’ने खरेदी केल्याची चर्चा सुरु झाली होती.
काय आहे ‘रुची सोया’?
गोरेगावातील आरे कॉलनीत नोंदणीकृत असलेल्या ‘रुची सोया’चे कार्पोरेट मुख्यालय नरीमन पॉइंट भागातील फ्री फ्रेस जर्नल मार्गावर, तुलसियानी चेंबर्समध्ये आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमधील साउथ तुकोजीगंज या अलिशान भागातून कंपनीचा सारा कारभार चालतो. ‘रुची सोया’चा न्युट्रीला हा ब्रांड प्रसिद्ध आहे. याशिवाय सनरिच हे सूर्यफूल तेल याशिवाय रुची गोल्ड आणि माधुरी दीक्षित जाहिरात करत असलेली महाकोश खाद्यतेले यामुळे ‘रुची सोया’ची भारतातील सर्व शहरी व ग्रामीण भागात ओळख आहे. भारतातील नंबर एक कुकिंग ऑईल कंपनी अशी ओळख असलेली ‘रुची सोया’ कंपनी गवारगम उद्योगातही अग्रेसर मानली जाते.
रिझर्व्ह बँकेच्या यादीतही
रिझर्व्ह बँकेने कर्ज बुडवणाऱ्यांच्या विरोधात ‘इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड’अन्वये त्यांना दिवाळखोर म्हणून जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु केल्यापासूनच ‘रुची सोया’ला ग्रहण लागले आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या दिवाळखोर कंपन्यांच्या यादीतही ‘रुची सोया’चा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना 13 डिसेंबरपर्यंत आपली वसुली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या कर्ज बुडव्यांनी दोन लाख कोटी रुपये बुडवले आहेत. सध्या देशातील विविध बँकांकडील थकीत कर्जांची एकून रक्कम 8 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. ही रक्कम बँकांकडून देण्यात आलेल्या एकूण कर्जांच्या तुलनेत 9.3 टक्के आहे.
कर्जबुडव्या कंपन्या
कर्जबुडव्या कंपन्यांच्या यादीत व्हिडिओकॉन, उत्तम गॅल्वा, एस्सार प्रोजेक्ट्स, जयप्रकाश असोसिएट्स, मनोत पॉवर, व्हिसा स्टील इत्यादीं पन्नास कंपन्यांचा समावेश आहे. त्यातील रुची सोयावर 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. व्हिडिओकॉन कंपनीवर 44 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. रिझर्व्ह बँकेने लँको इन्फ्रावर कारवाई करून थकीत कर्जे वसुलीच्या मोहिमेचा श्रीगणेशा केला होता. या कंपनीवर आयडीबीआय बँकेसह अन्य बँकांचे सुमारे 18 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.
कंपनी विका; पण कर्ज फेडा
“दिवाळखोरी कायद्यानुसार सरकारने सुरु केलेली अशी ही पहिलीच कारवाई असेल. केंद्रातील मोदी सरकार बॅंकांना जास्तीत जास्त भांडवल उपलब्ध करून देणार आहे. मोदी सरकारने आतापर्यंत बॅंकांना 70 हजार कोटींचे भांडवल उपलब्ध करुन दिले आहे. मात्र, थकबाकीदारांकडून कर्जवसुली करणे गरजेचे आहे. आता थकबाकीदारांनी कंपनी विकावी; मात्र कर्ज फेडायालाच लागेल! कर्जाची परतफेड न करणाऱ्या मोठ्या खासगी कंपन्यांकडून कर्जाची वसुली करण्यावर सरकारचा भर असेल. सरकारला मोजक्याच्या म्हणजेच केवळ पाच ते सहा मोठ्या बॅंका अस्तित्वात असाव्यात, असे वाटते.”
– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री