भारतातील रोहिंग्यांची ब्याद आताच संपवायला हवी!

0

मुंबई । शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून अहमदनगरमध्ये रोहिंग्यांसाठी एका विशिष्ट गटाने केलेल्या आंदोलनाविरोधात टीका करण्यात आली आहे. भारतातील रोहिंग्यांची ब्याद आताच संपवायला हवी, हे ठासून सांगतांना आंदोलन करणार्‍यांना जगाच्या नकाशामध्ये म्यानमार कुठे आहे, हे तरी माहीत आहे का? असा प्रश्नही ‘सामना’मध्ये विचारण्यात आला आहे. ज्यांना याबाबत माहीत नाही ते ही छाती पिटत आहेत.

‘सामना’मधून शिवसेनेनेचे टीकास्त्र
रोहिंग्यांसाठी नगरमधील एका विशिष्ट गटाने निषेध करावा हे भयंकरच आहे. ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही, असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात. महाराष्ट्रात ही कीड वळवळू लागली असेल, तर या हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवायला हवी. नगरच्या ‘रोहिंग्यां’ना राजकीय पाठबळ मिळू नये. कोणी देण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांच्या रोहिंग्या प्रेमाचाही बंदोबस्त करावाच लागेल, अशी टीका ’सामना’मध्ये करण्यात आली आहे.

राष्ट्राध्यक्षांचा पुतळा जाळून निषेध
म्यानमारमध्ये रोहिंग्यावर अन्याय-अत्याचार होत असल्याचे सांगत नगरमधील एका विशिष्ट समाजाने रस्त्यावर येऊन शुक्रवारी आंदोलन केले व म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा जाळून निषेध केला. या विशिष्ट समाजाला म्यानमार आणि रोहिग्यांच्या समस्याबाबत काय माहिती तरी आहे का, असा सवाल ’सामना’मध्ये विचारण्यात आला आहे. हे रोहिंगे पाकिस्तानातील अझहर मसूद वगैरे दहशतवादी मंडळींचे फतवे मानतात व धार्मिक तेढ निर्माण करून फुटीरतेची बीजे रोवतात. त्यांना म्यानमारचा तुकडा पाडायचा आहे. अशा फुटीरतावाद्यांना दयामाया दाखवणे कोणत्याही देशाला परवडणार नाही. या रोहिंग्यांच्या नावाने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे म्होरके गळा काढीत आहेत हे कसले लक्षण समजायचे व अशा रोहिंग्यांसाठी नगरमधील एका विशिष्ट गटाने निषेध करावा, हेसुद्धा भयंकरच आहे.

सावध राहण्याचे आवाहन
रोहिंग्यांना निर्वासित म्हणून हिंदुस्थानात आश्रय द्यावा, अशा राजकीय खटपटी-लटपटी येथील काही बेगडी निधर्मीवाद्यांनी केल्या. ‘मानवता’ वगैरे शब्दांचे बुडबुडे त्यांनी फोडले तरी पंतप्रधान मोदी अजिबात बधले नाहीत. त्याबद्दल आम्ही त्यांचे खास अभिनंदन करीत आहोत. प. बंगाल आणि आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांनी आधीच हैदोस घातला आहे. त्यात आता या म्यानमारी रोहिंग्यांची भर नको, अशी टीका ’सामना’ मध्ये करण्यात आली. तसेच सरकारने रोहिंग्यांच्या प्रश्नाबाबत अती सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.