शिरपूर । आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात नेहा दत्तात्रय पाटील यांचे व्याख्यान पार पडले. महाविद्यालयातील एम. फार्मसी चे विद्यार्थी व प्राध्यापक या व्याख्यानाला उपस्थित होते.
नेहा यांनी नुकताच आयसर कोलकाता (इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्च), पश्चिम बंगाल येथून इम्युनॉलॉजीत एम. एस. चे शिक्षण पूर्ण केलेले आहे व लॅक्झेम्बर्ग इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ, यूरोप येथे पीएचडी चे उच्च शिक्षणा साठी जात आहे. कुमारी नेहा यांनी या आधी एम. एस. चालू असताना जर्मनीतील बर्लिन येथील मॅक्स प्लॅन्क युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणी जाऊन संशोधन केलेले आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये संशोधन करण्यासाठी कुठले पर्याय व संधी तसेच फेलोशिप्स उपलब्ध आहेत हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता.
बाहेरच्या देशातील शिक्षणाकडे लक्ष द्या
भारतातील संशोधन संस्थे मध्ये प्रवेश घेण्यासाठी जे.आर.एफ.नेट/सेट, सी.एस.आय.आर., गेट ह्या इंट्रान्स एक्झाम होत असतात. आपल्या देशामध्ये संशोधनात झपाट्याने वाढ होत असताना देखील काही नवीन तंत्रज्ञान अवगत करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बाहेरच्या देशातील शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. परदेशातील नामांकित विद्यापिठातून शिक्षण घेऊन आल्यास भारतातील संशोधन क्षमतेमध्ये नक्कीच भर पडेल असे प्रतिपादन नेहा पाटील यांनी यावेळी केले. परदेशातील विद्यापीठांमध्ये मास्टर्स किंवा पीएचडी च्या प्रवेशा साठी काही निकष असतात त्यामध्ये प्रामुख्याने जी. आर. इ. व टोफेल, आई. इ. एल. टी. एस. यां सारख्या आंतर्राष्ट्रीय परीक्षांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांची गुणवत्ता, ज्या विषयामध्ये शिक्षण घ्यावयाचे आहे त्यातील ज्ञान त्याच्या संभंदीत अद्ययावत माहिती या बघितल्या जातात, असेही त्या म्हणाल्या.