भारतातील सर्वात मोठ्या धरणाचे रविवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

0

अहमदाबाद | भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १९६१ साली पायाभरणी, शिलान्यास केलेल्या भारतातील महत्त्वाकांक्षी आणि सर्वाधिक वादग्रस्त सरदार सरोवर धरण प्रकल्पाचे रविवारी, १७ सप्टेंबर रोजी लोकार्पण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी, त्यांच्याच हस्ते, १७ जून रोजी बंद केलेले धरणाचे ३० दरवाजे उघडून हे धरण राष्ट्राला समर्पित केले जाईल. नर्मदा नदीवर बांधलेले हे धरण भारतातील सर्वात मोठे व जगातील दुसरे सर्वात मोठे धरण आहे.

नर्मदा कंट्रोल अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, नर्मदेवर बांधल्या जाणाऱ्या तीस प्रस्तावित धरणातील हे एक धरण आहे. या धरणाचा प्रत्येक दरवाजा ४५० टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा अवधी लागतो. धरणाची उंची 163 मीटर तर लांबी 1,210 मीटर आहे. दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पुर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती.

१९४५ मध्ये मांडली कल्पना
सरदार पटेल यांनी १९४५ मध्ये या धरणाची कल्पना मांडली होती. मुंबईतील इंजीनियर जमदेशजी एम वाच्छा यांनी सरदार सरोवर प्रकल्पाचा आराखडा बनविला होता. मात्र प्रकल्पाचा आराखडा व रूपरेषा निश्चित करण्यातच तब्बल १५ वर्षे गेली. त्यानंतर पंडित नेहरूंच्या हस्ते ५ एप्रिल १९६१ रोजी या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. एखाद्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाचे सर्व काम पूर्ण होण्यास ५६ वर्षे लागण्याते हे जगातील विरळ उदाहरण असावे.

16 हजार कोटी कमाई
या धरणावरील प्रकल्पाने आजवर ४१४१ कोटी युनीटची वीज निर्मिती केली आहे. त्याची किंमत 16,000 कोटी इतकी आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सरदार सरोवर प्रकल्प हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. त्यामध्ये आजवर सर्वाधिक कॉक्रीट वापरल्यामुळेही ते चर्चेत आहे. यासाठी 86.20 लाख क्यूबिक मीटर कॉक्रीट वापरले गेले ज्यातून पृथ्वी पासून चंद्रापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार झाला असता.

विविध कारणांनी विलंब
अनेक कारणांमुळे सरदार सरोवर प्रकल्पाला विलंब होत गेला. १९८५ पासून धरणाला जोरदार विरोध सुरु झाला. आजही मध्यप्रदेशात विरोध सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांचे लोकार्पण सोहळ्याचे भाषणही विरोधाच्या सावटातच होणार आहे. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामुळे १९९६ साली या धरणाचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००० साली पुन्हा काम सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर धरणाचे काम पुन्हा वेगाने सुरु करण्यात आले.

एलईडी बल्बची रोषणाई
सरदार सरोवर धरणावर 1000 वॉट चे 620 एलईडी बल्ब आहेत. गुलाबी, पांढरे आणि लाल रंगांच्या या 620 एलईडी बल्बपैकी 120 बल्ब धरणाच्या 30 गेटवर लावण्यात आले आहेत. या रोषणाईतून धारण ओव्हर फ्लो असल्याचा सुरेख आभास निर्माण होतो.

सर्वाधिक फायदा गुजरातला
सरदार सरोवर प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा गुजरात राज्याला होणार आहे. गुजरातच्या 15 जिल्ह्यातील 3137 गांवातील 18.45 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. तसेच ९ हजार गावांना कालव्यांतून नर्मदेचे पाणी मिळेल. या धरणातून तयार झालेल्या 6000 मेगावॉट विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. राजस्थानला फक्त पाणी मिळेल. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास गुजरातची सहा वर्षांची शेतीच्या पाण्याची, सिंचनाची गरज भागेल.

१४४ गावे पुसली जाणार
मध्यप्रदेशांत भोपाळमध्ये आजही सरदार सरोवर प्रकल्पाविरोधात उपोषण आंदोलन सुरु आहे. सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर म्हणतात की, सरदार सरोवर प्रकल्पाचे 30 गेट खुलताच मध्य प्रदेशांतील अलीराजपुर, बड़वानी, धार, खारगोन जिल्ह्यातील 192 गांवे, महाराष्ट्रातील 33 आणि गुजरातमधील 19 गांवे जगाच्या नकाशावरून पुसले जातील आणि इतिहासाचा हिस्सा बनतील. देशांतील शहरी भाग उजळवण्यासाठी, तिथली पाण्याची गरज भागविण्यासाठी ग्रामीण भागातील, खेड्यातील हजारो लोकांच्या घरात नेहमीसाठी अंधार होईल.