नवी दिल्ली : देशातील जवळपास 70 टक्के एटीएम मशिनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे एटीएम कधीही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात. केंद्र सरकारने याबाबत अलर्ट जारी केला आहे.
देशातील 70 टक्के एटीएममध्ये मायक्रोसॉफ्टने सपोर्ट काढून घेतलेल्या विंडोज दझ चा वापर होतो. 2014 पासून मायक्रोसॉफ्टने विंडोज दझ साठी सुरक्षा आणि इतर सुविधा पुरवण्याचे बंद केले आहे. यामुळे हे एटीएम सहज सायबर हल्ल्याचे बळी ठरू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँक, इतर बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणार्या महत्त्वाच्या इतर वित्तीय संस्थांना केंद्र सरकारने याबाबत अॅलर्ट जारी केला आहे.
शुक्रवारी जगभरातील 99 देशांमध्ये सायबर हल्ला झाला होता. भारताचाही यात समावेश होता. आंध्र प्रदेश पोलिसांचे 102 कॉम्प्युटर्स सायबर हल्लेखोरांनी हॅक केले होते. विजयवाडा, तिरुपती, विशाखापट्टणम आणि श्रीकाकुलम येथील पोलिसांचे सर्व्हर फ्रान्समधून हॅक करण्यात आले होते. यातील दिलासा देणारी बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालय आणि इतर राज्यांच्या मदतीने आंध्र पोलिसांना आपला डेटा सुरक्षित ठेवणं शक्य झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता देशातील एटीएम मशिन्स सायबर हल्लेखारांच्या रडारवर आहेत. त्यामुळे अधिक खबरदारी घेतली जात असल्याचेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.