भारताची अंतर्गत स्थिती अस्थिर करण्यासाठी चीन नक्षलवाद्यांच्या माध्यमातून कारवाया करण्याची योजना तयार करीत आहे. पिपल्स लिबरेशन आर्मीची गुप्तहेर शाखा याची योजना बनवित आहे. नक्षलवाद्यांच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरूणाचल प्रदेशातील अतिरेकी संघटना नॅशनल सोशालिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन) सोबत चीन संपर्क साधून आहे. या संघटनेचे चार हजारहून अधिक सदस्य आहेत. त्यांना चीनी अधिकाऱ्यांनी प्रशिक्षित केलेले आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड येथील नक्षलवाद्यांशी त्यांना समन्वय साधायचा आहे. त्यांना शस्त्रे आणि आर्थिक मदत दिली जात आहे.
अरूणाचल प्रदेशातील एका गावात भारतविरोधी कारवायांचे प्रशिक्षण सुरू आहे. हे गाव चांगलाना जिल्ह्यात आहे. नामपोंग तालुक्यातील काही गावांमध्ये नागा अतिरेकी समांतर शासन चालवित आहेत. म्यानमार आणि आसाम सीमेवर ही गावे आहेत. सुरक्षा दलांशी त्यांची झटापट नेहमीच होत असते. जुलै महिन्यात नक्षलवाद्यांच्या अनेक गटांची बैठक या विभागात झाली होती. नक्षलवादी सुत्रांच्या म्हणण्यानुसार अरूणाचल प्रदेश मध्ये झालेल्या बैठकीनंतर नक्षली नेत्यांनी झारखंडमधील बोकारो येथील कॅडरना सर्व माहिती दिली. सेंट्रल मिलिटरी कमिशन सदस्य अरविंद सिंह उर्फ निशांतही त्यात सहभागी झाली होता.