भारतात ई-कचऱ्यात तब्बल ३१.६ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : भारतात ई कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. २०२०मध्ये भारतात तब्बल १०,१४,९६१.२ टन ई कचरा तयार झाला होता. हे प्रमाण २०१९च्या तुलनेत ३१.६ टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती पर्यावरण, वन व हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत दिली.

पर्यावरण मंत्रालयाने २१ प्रकारच्या विद्युत व विद्युत उपकरणांना ई-कचरा म्हणून घोषित केले आहे. सरकारने सन २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या कालावधीत देशातील ई-कचरा वाढीचे मूल्यांकन केले आहे. ई-कचरा निर्मितीचा अंदाज ज्या सूत्रानुसार काढला जातो त्यामध्ये विद्युत आणि विद्युत उपकरणांच्या विक्रीचा समावेश आहे. उपकरणांच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार, २००७-०८ या वर्षापासून उपकरणांच्या विक्रीत सतत वाढ झाली आहे आणि त्यामुळे ई-कचरा निर्मितीत देखील मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, देशात ई कचऱ्यामुळे आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याचंही चौबे यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, संबंधित मंत्रालय पर्यावरणपूरक व पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ई-कचरा संकलन यंत्रणेच्या स्थापनेस प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे ई कचऱ्याच्या बेकायदेशीर पुनर्वापरावर आळा बसतोय, असंही ते म्हणाले.

सध्या आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या २० राज्यांमध्ये ई-कचर्‍याचे ४०० डिस्मेंटलर्स / रीसायकलर्स कार्यरत आहेत. या अधिकृत डिस्मेंटलर्स / रीसायकलर्सची वार्षिक प्रक्रिया करण्याची क्षमता 10,68,542.72 टन आहे.