पिंपरी-चिंचवड : भारतात चित्रपट हे मनोरंजनाचे साधन समजले जाते. त्यामुळे चित्रपटातून समाज प्रबोधन घडत नाही, अशी खंत ‘सैराट’ फेम प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चिंचवड येथे व्यक्त केली. नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय शहीद भगतसिंग व्याख्यानमालेत ‘चित्रपटातून प्रबोधन’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना मंजुळे बोलत होते. माजी महापौर अनिता फरांदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. मानव कांबळे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, भारत मंजुळे, प्रताप गुरव आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
नाटक, चित्रपट प्रभावी माध्यम
नागराज मंजुळे पुढे म्हणाले की, संवादातून माणूस जसा व्यक्त होत असतो; त्याचप्रकारे नाटक, चित्रपट ही व्यक्त होण्याची प्रभावी माध्यमे आहेत. परंतु भारतात प्रामुख्याने चित्रपटांकडे मनोरंजनाचे एक सशक्त साधन म्हणूनच पाहिले जाते. साहजिकच त्यामुळे एखादा समाज प्रबोधनाचा हेतू मनाशी ठेवून जरी चित्रपटनिर्मिती केली, तरी प्रेक्षकांचा दृष्टिकोन कसा असेल याचा नक्की अंदाज बांधता येत नाही. ‘सैराट’ या चित्रपटातून जातीयविषमतेने जीवन संपवणे योग्य नाही. हा संदेश मला जनमाणसात रुजवायचा होता. परंतु, तो संदेश लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. याउलट त्यातील ‘झिंगाट’च लोकांना आवडले आणि तेच त्यांनी डोक्यावर घेतले, असेही मंजुळे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पवार यांनी केले. सूत्रसंचालन सविता इंगळे यांनी तर विनिता पिसाळ यांनी आभार मानले.