आज जागतिक अल्झायमर जागरुकता दिन, ५० टक्के जेष्ठ नागरीक वैफल्यग्रस्त; उपचाराविना होतेय फरफट
मुंबई । २१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर (स्मृतिभ्रंश) जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात अल्झायमर व संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी झाली असून ही संख्या दर २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते. एकट्या भारतात, साडे चार दशलक्ष लोकांमध्ये अल्झायमरचा एखादा प्रकार आढळून आला आहे. हा आजार तिसाव्या वर्षी देखील होऊ शकतो परंतु सहसा साठीनंतर ह्या आजाराचे निदान होते. तसेच वाढत्या वयाबरोबर या आजाराचा धोका वाढतो.
योग्य उपचारांच्या माध्यमातून बरा होतो ‘अल्झायमर’भारतात आलेल्या आधुनिक वैद्यकीय क्रांतीमुळे भारतीयांचे जीवनमान ८० च्या पुढे जात असून या वयातील लोकसंख्येच्या ४० टक्के लोक या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता आहे. चोर पावलांनी येणारा हा स्मृतिभ्रंश वाढत्या वयानुसार वाढत जातो परंतु भारतामध्ये ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हा आजार गांभीर्याने घेत नाहीत. अल्झायमर रोगाचे सुरुवातीस निदान करणे कठिण असते. वयपरत्वे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. वार्धक्य व आनुवंशिकता यांमुळे हा रोग होण्याची शक्यता असते. आधुनिक वैद्यकीय तापासण्या करून मेंदूच्या प्रमस्तिष्काच्या बाह्यकांचा र्हास कळू शकतो. हा आजार प्रतिबंधक उपचारांनी दूर ठेवू शकतो म्हणजेच वयाची साठी उलटल्यानंतर जीवनपद्धतीत बदल करून घेतला पाहिजे.
असे होते व्यक्तीचे वर्तन
अल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. नेहमीचा रस्ताही विसरतो. त्या व्यक्तीला निरनिराळे भास होतात. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. वाचणे, लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होत जाते. नैसर्गिक विधीही समजत नाहीत. त्यामुळे त्यावरचे नियंत्रणही जाते. शेवटी स्नायू र्हासामुळे सर्व हालचाली मंदावतात व रुग्ण बिछान्यात पडून राहतो. म्हतारपण झाले की स्मरणशक्ती कमी होतेच, हे गृहीत धरून चालतात, स्मृतिभ्रंश या आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरकडे नेणे गरजेचे आहे.