नवी दिल्ली : मानवी आरोग्यास धोकादायक अशा झिका व्हायरसने भारतात शिरकाव केल्याची कबुली केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिल्याने खळबळ उडाली आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या चार रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत सांगितले.
गरोदर महिलांना सर्वाधिक धोका
झिकाची लागण झालेले तीन रुग्ण गुजरात राज्यातील असून, यात एका गरोदर महिलेचा समावेश आहे. चौथा रुग्ण तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील आहे. मेंदू आणि मज्जासंस्थेवर अत्यंत गंभीर परिणाम झिका व्हायरसमुळे होत आहे. गरोदर महिलांना झिकाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. एकदा का हा विषाणू मानवी शरीरात दाखल झाला, की तो मेंदू आणि मज्जासंस्थेवर ताबा मिळवितो. झिकाची लागण झालेल्या गरोदर महिलेच्या गर्भालाही यामुळे धोका उत्पन्न होतो. गर्भातल्या बाळाच्या मेंदूची वाढ खुंटते. अशी मुले जन्मतःच अतिमंद असतात. जन्मानंतर या मुलांना मिरगीचे झटके येतात.
इडिस इजिप्ती डास विषाणू वाहक
युगांडाच्या झिका जंगलात सर्वात प्रथम माकडांमध्ये या आजाराची लक्षणे आढळली. त्यामुळे यास झिका असे नाव पडले. त्यानंतर ब्राझीलमध्ये 2015 मध्ये या आजाराचा उद्रेक झाला होऊन 17 लाख रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 3500 मुलांच्या मेंदूवर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. जगातील 70 देशांमध्ये या विषाणूने प्रवेश केला आहे. आतापर्यंत या 40 लाख लोकांना त्याची लागण झाली आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला अत्यंत घातक आजारांच्या यादीत टाकले आहे. याची लागण झालेल्या 10 टक्के लोकांना कसलाही त्रास होत नाही. इडिस इजिप्ती या विषाणू वाहक डासांच्या माध्यमातून तो पसरतो.