मुंबई – देशांतर्गत असो की विदेशात विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात विमाने खरेदीचा धडाका लावला असला तरी, त्या तुलनेत वैमानिकांची संख्या अपुरी असल्याने कंपन्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. २०३०पर्यंत देशातील विमान कंपन्यांच्या ताफ्यात एक हजारांहून अधिक विमाने दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी किमान हजार वैमानिकांची निकड या नात्याने येत्या दशकभरात दहा हजार वैमानिकांची आवश्यकता भासणार आहे.
इंडिगो, स्पाइसजेट, जेट एअरवेज, गो एअर, विस्तार आणि एअर एशिया आदी प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांकडून मार्च २०१९पर्यंत एकूण १०० नवी विमाने खरेदी करण्यात येणार आहेत, अशी माहिती एका विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याचाच अर्थ ८०० ते १००० वैमानिकांची तातडीने गरज भासणार आहे. त्यामध्ये फर्स्ट ऑफिसर आणि कमांडर्सचा (कॅप्टन) समावेश आहे. सध्या देशात फ्लाइट ऑफिसरची कमतरता नाही मात्र, कमांडर्सचा मोठा दुष्काळ आहे. ‘येत्या वर्षभरात देशात ८०० नव्या कमांडरची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती सिडनीस्थित ‘कापा सेंटर फॉर एव्हिएशन’चे दक्षिण आशियाई सीईओ कपिल कौल यांनी दिली. सध्या देशात वर्षभरात ३० टक्के वैमानिकांची कमतरता भासत आहे. कंपन्यांकडून फर्स्ट ऑफिसरना प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर अनुभवांती त्यांना कॅप्टनपदी बढती दिली जाते. असे असूनही मोठ्या प्रमाणावर होणारा सेवांचा विस्तार पाहता कंपन्यांकडे अजूनही कॅप्टनची कमतरता भासते. त्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या वैमानिकांवर अतिताण येत आहे.
‘ज्या प्रमाणात भारतीय हवाई उद्योगाची वाढ होत आहे, त्या प्रमाणात देशात प्रशिक्षित आणि अनुभवी वैमानिकांची उपलब्धता नाही. त्यामुळे भारतीय कंपन्यांना कायमच कुशल आणि प्रशिक्षत वैमानिकांची आवश्यकता भासते,’ असे मत गो एअरचे सीईओ कॉर्नेलिस व्रिस्विक यांनी व्यक्त केले. लालफितीचा कारभार आणि कडक नियम यांमुळे देशात मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित वैमानिकांची वानवा असल्याचेही त्यांनी नमूद केले. एका वैमानिकाचा परवाना प्राप्त करण्यासाठी किमान ४०-५०-६० दिवसांचा कालावधी लागतो. आपल्या देशाच्या तुलनेत अन्य देशांमध्ये किमान कालावधीत परवाने प्राप्त होतात, असेही व्रिस्विक यांनी नमूद केले.
रशियन, मेक्सिकनचा भरणा
नागरी हवाई वाहतूक संचलनालयातर्फे (डीजीसीए) वैमानिकांची निवड करताना हवाई दलाचे वैद्यकीय निकष वापरले जातात. त्यामुळे वैमानिकांची निवड ही प्रक्रिया क्लिष्ट आणि अवघड होऊन बसते, अशी माहिती एका विमान कंपनीच्या वरिष्ठ वैमानिकाने दिली. त्यामुळे अमेरिकेतील आणि युरोपातील अनुभवी आणि प्रशिक्षित वैमानिक भारतीय विमानकंपन्यांना परवडत नाहीत. या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्यांमध्ये रशियन, युक्रेनियन आणि मेक्सिकन वैमानिकांचा मोठ्या प्रमाणात भरणा असतो, असेही या वरिष्ठ वैमानिकाने स्पष्ट केले. ही समस्या प्रामुख्याने छोट्या आणि प्रादेशिक सेवा देणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात भेडसावतो.
मोठ्या वेतनचीही समस्या
विमान संचलित करण्याचा युरोप, अमेरिकेतील अनुभव असणाऱ्या प्रशिक्षित वैमानिकाचे मासिक वेतन (१३,००० डॉलर किंवा ८.८४ लाख रुपये) भारतीय वैमानिकाच्या तुलनेत ३० ते ३५ टक्क्यांनी अधिक असते. भारतीय वैमानिकाला दरमहा ६.५० लाख रुपये वेतन मिळते, अशी माहिती एका भारतीय विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बऱ्याच कंपन्या दरवर्षी भारतीय वैमानिकांच्या वेतनात ५ ते ७ टक्क्यांची वाढ करतात. मात्र, भारतीय आणि विदेशी वैमानिकांची वेतनाच्या बाबतीत कधीही बरोबरी होऊ शकत नाही.
चिनी कंपन्यांच्या पायघड्या
चिनी कंपन्यांकडून विदेशी कॅप्टनना वार्षिक ३,१४,००० डॉलर करमुक्त वेतन दिले जाते. भारतीय कंपन्यांकडून विदेशी कॅप्टनना देण्यात येणाऱ्या वार्षिक वेतनाच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीहून अधिक आहे. आगामी २० वर्षांत चीनला दरवर्षी ४,००० ते ५,००० वैमानिकांची गरज भासणार आहे. हे प्रमाण भारताच्या तुलनेत पाचपट आहे. बोइंगच्या एका अहवालानुसार जगभरात येत्या वीस वर्षांत साडेसहा लाख वैमानिकांची निकड भासणार आहे.
अनुभव किती?
‘डीडीजीसीए’च्या निकषानुसार फर्स्ट ऑफिसरने १५०० तासाचे उड्डाण पूर्ण केल्यानंतर त्याची नियुक्ती कॅप्टन म्हणून होते. मात्र, ‘एअर इंडिगो’च्या कॅप्टनसाठी ३००० तासांचे उड्डाण अपेक्षित आहे.