भारतात दर मिनिटाला 2 लोक वायू प्रदुषणाचे बळी!

0

नवी दिल्ली । भारतातील हवा दिवसेंदिवस विषारी बनत असून दर मिनिटाला 2 लोक हवाप्रदुषणाचे बळी ठरत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. दी लॅन्केट नावाच्या वैद्यक नियतकालिकात प्रकाशित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये भारतातील काही शहरांचाही समावेश आहे. या माहितीसाठी 2010 सालातील आकडेवारीचा आधार घेण्यात आलेला आहे.

जगात पाटणा व दिल्ली सर्वाधिक प्रदुषित

उत्तर भारतातील वातावरणातील प्रदुषित धुके लोकांच्या मरणाचे गंभीर कारण ठरते आहे. कामगार वर्गाचेच जगणे प्रदुषणाने धोक्यात आणलेले असल्याचे जागतिक बँकेनेही मान्य केलेले आहे.48 शास्त्रज्ञांच्या एका गटाने केलेल्या या अभ्यासानंतर हा अहवाल जारी केलेला आहे. जगात पाटणा व दिल्ली ही भारतातील सर्वाधिक प्रदुषित शहरे आहेत. केवळ हवा प्रदुषणामुळेच भारतात दररोज 18 हजार लोकांची प्रकृती धोक्यात येते यामुळे कामगारांकडून जगातील अर्थव्यवस्थेला मिळणारे वार्षिक 225 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न धोक्यात आल्याचे जागतिक बँकेने मान्य केलेले आहे.

कोळसा वीज प्रकल्प घातक

हवाप्रदुषणात भारतातील कोळशापासून वीजनिर्मिती करणार्‍या प्रकल्पांचा वाटा मोठा आहे. भारताचे वन व पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार सरकारचे दरवर्षी 7 कोटी रुपये हवा प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी खर्च होत असले तरी भारतात प्रदुषणामुळे दरवर्षी किती लोकांना फुफ्फुसाचे आजार होतात, किंवा निव्वळ हवाप्रदुषणामुळे दरवर्षी किती लोक मृत्यूमुखी पडतात, याची खात्रीशीर माहिती देणारा कोणताच अहवाल सरकारकडे उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.

मुदतपुर्व बाळंतपणे चिंताजनक

हवाप्रदुषणामुळे मुदतपुर्व बाळंतपणांची संख्या वाढणेही चिंताजनक बनलेले आहे. हवाप्रदुषण व वातावरणातील प्रतिकूल बदल हे एकमेकांशी निगडित मुद्दे असून संयुक्तपणे त्यांचा मुकाबला करण्याची गरज असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. मानवी आरोग्यासाठी मोठी आपत्ती असलेल्या या आव्हानाचा मुकाबला करणे हेच 21 व्या शतकातील सर्वात मोठे काम भारतासाठी ठरणार आहे.