भारतात सर्वोच्च तर जगात दुसर्‍या क्रमांकाचे तापमान

0

पुणे : 15 दिवसांपासून महाराष्ट्राला होरपळून टाकणार्‍या उष्णतेने महाराष्ट्रातील भिरा या गावास तापमानाच्या बाबतीत देशात सर्वोच्च ठिकाणी नेऊन बसविले आहे. राजस्थान किंवा गुजरातच्या वाळवंटालाही मागे टाकेल अशी आग येथे सुर्य ओकताना दिसत आहे. भिरामध्ये बुधवारी कमाल तापमान 46.5 अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले. महाराष्ट्रातील चार ठिकाणे देशातील दहा सर्वाधिक उष्ण ठिकाणांमध्ये आहेत. एकीकडे हवामान शास्त्र विभाग यास उष्णतेची लाट मानत नसला तरीही संपूर्ण देशात सर्वाधिक तापमान सध्या महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात ही तीन राज्ये उष्णतेमुळे होरपळून निघत आहेत. त्यात सर्वाधिक तापमान महाराष्ट्रात आहे. मार्च महिन्यात 35 अंश सेल्सियस हे सरासरी कमाल तापमान असलेल्या बर्‍याच ठिकाणी पार्‍याने 40 अंश सेल्सियसची सीमा ओलांडली असून, थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी देखील उन्हाळा असह्य झाला आहे.

भिराचे तापमान का वाढतेय
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेने तापमानाचे सर्व रेकॉर्ड तोडले असल्याचे दिसत आहे. विशेषतः मार्च महिन्याच्या मध्यापासून रोज थोडा-थोडा पारा वाढणार्‍या रायगड जिल्हयातील भिरा या गावाचे तापमान थेट 46.5 अंश सेल्सियसपर्यंत पोहचले आहे. डोंगरांनी वेढलेल्या आणि नदीच्या काठी वसलेल्या या गावात एवढी उष्णता कशी वाढत आहे, हे देखील एक कोडेच आहे. अति उष्णतेमुळे भिरा गावातील ग्रामस्थांना त्रास सुरू झाला आहे.

महाराष्ट्र तापलाय
स्कायमेटवेदर या खासगी हवामान संस्थेने बुधवारी पुन्हा एकदा देशातील दहा सर्वाधिक उष्ण ठिकाणांची यादी प्रकाशित केली. या यादीमधील सर्व ठिकाणे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील आहेत. या दहा ठिकाणांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार ठिकाणे आहेत. पहिल्या व दुसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्रातीलच भिरा आणि अकोला आहेत.

तापमानात लक्षणीय वाढ
पुणे वेधशाळेने बुधवारी सकाळी नोंदविलेल्या आकडयांनुसार आणि प्रकाशित केलेल्या दैनंदिन हवामान वृत्तानुसार विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी रात्रीही वातावरण उष्ण आहे. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तलुनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

प्रमुख शहरांचे तापमान
मुंबई (कुलाबा) 32.2, सातांक्रुझ 35.0, अलिबाग 31.9, रत्नागिरी 33.0, पणजी (गोवा) 33.8, डहाणू 35.0, भिरा 46.5, पुणे 40.1, जळगाव 42.8, कोल्हापूर 37.8, महाबळेश्‍वर 34.3, मालेगाव 43.2, नाशिक 40.3, सांगली 39.4, सातारा 40.0, सोलापूर 41.3, उस्मानाबाद 40.1, औरंगाबाद 40.8, परभणी 41.2, अकोला 43.8, अमरावती 41.6, बुलढाणा 40.6, गोंदिया 41.0, नागपूर 42.6, वाशिम 38.2, वर्धा 42.9, यवतमाळ 41.5.

पावसाची शक्यता
राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा येथे 46.5 अं.से. तर सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे 19.0अं.से. नोंदवले गेले. 31 मार्चपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 30 व 31 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. 1 एप्रिल रोजी मात्र मराठवाडा आणि 2 एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाडयाच्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च तापमान असलेली देशातील दहा ठिकाणे 
शहर, गाव राज्य तापमान

भिरा महाराष्ट्र 46.5
अकोला महाराष्ट्र 43.8
अमरेली गुजरात 43.2
जगलपुर छत्तीसगड 43.2
चंद्रपुर महाराष्ट्र 43.2
मालेगाव महाराष्ट्र 43.2
बुंदी राजस्थान 43.0
जळगाव महाराष्ट्र 42.8
सुरेंद्रनगर गुजरात 42.8

पुण्यात अंगाची लाही-लाही
पुणे शहरात तापमान मोजल्या जाणार्‍या तीनही ठिकाणी पार्‍याने चाळीशी ओलांडली असून, सकाळपासून उष्णतेने अंगाची लाहीलाही होत होती. हवामानशास्त्र विभागाने बुधवारी सकाळी नोंदविलेल्या 24 तासांच्या आकडयांनुसार मध्यवर्ती पुण्यात कमाल तापमान 40.1 आले. लोहगावमध्ये पारा 41 तर पाषाणमध्ये 41.3 पर्यंत वर जाऊन पोहचला होता. सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात 3 ते 4 आणि तापमानात 3 ते 5 अंश सेल्सियसने वाढ झाली आहे.