भारतात हजारो अतिरेकी घुसले!

0

कोलकाता । मुंबईतील लोकल गाड्या आणि रेल्वे रूळ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची बातमी ताजी असतानाच पश्‍चिम बंगालमार्गे भारतात हजारो अतिरेकी घुसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारतात 2015 च्या तुलनेत सन 2016 मध्ये तीनपट अधिक अतिरेकी घुसले आहेत. विशेष म्हणजे पश्‍चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा या तीन राज्यांत सर्वाधिक अतिरेकी घुसल्याचा धक्कादायक अहवाल देत बांगलादेश सरकारने भारताला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बांगलादेश सरकारने भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाला हा अहवाल दिला आहे. या तिन्ही राज्यांत हरकत उल जिहादी अल इस्लामी (एयूजेआय) आणि जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या दोन अतिरेकी संघटनांचे अतिरेकी घुसले आहेत. पश्‍चिम बंगालच्या सीमेवरून 720 आणि आसाम व त्रिपुराच्या सीमेवरून 1,290 संशयित अतिरेकी भारतात घुसल्याचा संशय या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या अहवालावर भारतीय अधिकार्‍यांनी शंका व्यक्त केली आहे.

याच पार्श्‍वभूमीवर, ही संख्या जरी अंदाजावर आधारित असली, तरी भारतासाठी धोकादायक आहे. याचे कारण असे की, 2014 मध्ये 800, तर 2015 मध्ये 659 अतिरेक्यांनी भारतात प्रवेश केल्याचे भारताच्या गुप्त अहवालातच यापूर्वी नमूद करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये बर्दवान जिल्ह्यातील खागरागड येथे स्फोट झाला होता. त्याचा तपास एनआयए करत असून जेएमबीशी या स्फोटाचे धागेदोरे जुळलेले असल्याचे त्या तपासात उघड झाले होते. यामुळेही हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून अहवालातील सतर्कतेच्या इशार्‍यात तथ्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या गृहविभागाने या अहवालाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तपास सुरू केला आहे, तर आसाम पोलिसांना मात्र या अहवालाची गंभीर दखल घेतली आहे. आसाममध्ये अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत. गेल्या 6 महिन्यांत आसाममध्ये जमाल उल मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या दहशतवादी संघटनेच्या 54 अतिरेक्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि आमदारांची एक समितीही इथे स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पल्लव भट्टाचार्य यांनी दिली आहे.

जेएमबीचा मोहरक्या भारतात
दरम्यान, जेएमबीचा सेक्रेटरी इफ्तादूर रहमान हा 12 जानेवारी रोजी बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आला असून, पश्‍चिम बंगालमधील अनेकांशी तो संपर्क साधून आहे. इफ्तादूर रहमान दिल्लीलाही जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. इफ्तादूरचे खरे नाव सज्जाद हुसैन असे आहे. 18 जानेवारी रोजी मायमेनसिंह जिल्ह्यात एक बैठक झाली होती. त्यात आसाम, पश्‍चिम बंगाल आणि नवी दिल्लीतील लोक आणि जेएमबी व एयूजेआयचे अतिरेकी सहभागी झाले होते. यामुळेही बांगलादेशाच्या अहवालावर भारताने लक्ष केंद्रित केले आहे.

अतिरेक्यांनी मार्ग बदलला
खागरागड येथील घटनेनंतर या अतिरेक्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. त्यांना ट्रॅक करणे कठीण झाले आहे, असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले आहे. पूर्वी हे अतिरेकी मालदा आणि मुर्शिदाबाद या नद्यांच्या जिल्ह्यातून भारतात प्रवेश करायचे. आता ते आसाम आणि त्रिपुरामार्गे पश्‍चिम बंगालमध्ये घुसत आहेत. त्यांच्यासाठी हा मार्ग अधिक सोपा असल्याचे या पोलीस अधिकार्‍याचे म्हणणे आहे.