श्रीलंका : श्रीलंका दौर्यातील पहिल्या सामन्यात भारताने समाधानकारक कामगिरी केली आहे. शुक्रवारी सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या प्रभावी मार्यासमोर श्रीलंका अध्यक्षीय संघाचा डाव 187 धावांवर गडगडला. कुलदीपने 14 धावांमध्ये 4 आणि जडेजाने 31 धावांमध्ये 3 विकेट्स मिळवल्यामुळे श्रीलंका अध्यक्षीय संघ 55.5 षटकांमध्ये 187 धावांवर आटोपला. या दोघांशिवाय मोहम्मद शमीने 2 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी चोख उत्तर देताना दिवसअखेर 3 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघ पहिल्या डावात अजून 52 धावांनी पिछाडीवरअसून त्याचे सात फलंदाज खेळायचे बाकी आहेत. खेळ संपला तेव्हा विराट कोहली 34 आणि अजिंक्य रहाणे 30 धावांवर खेळत होता.
नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करणार्या श्रीलंका अध्यक्शिय संघाकडून दानुष्का गुणातलिकाने 74 धावांची खेळी केली. कोशल सिल्वा झटपट बाद झाल्यावर दानुष्का आणि लाहिरु थिरीमानेने संघाला सावरून नेताना 130 धावांची भागिदारी केली. थिरमाने 59 धावांवर बाद झाला. गुणतालिका बाद झाल्यावर मात्र श्रीलंका अध्यक्शिय संघाचे फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरु शकले नाहीत.
भारताच्या डावात दुखापतीतून सावरलेल्या लोकेश राहुलने छाप पाडली. राहुलने पहिल्या डावात 54 धावा केल्या. दुसरीकडे मुकुंदला मात्र प्रभाव पाडता आला नाही. पहिल्याच चेडुवर तो खाते न खोलता तंबूत परतला. पुजराही 12 धावांवर लगेचच बाद झाला. त्यानंतर विराट कोहली (नाबाद 34) आणि अजिंक्य रहाणेने (नाबाद 30) संघाची पडझड होऊ दिली नाही.