भारताने पहिला ‘वन’ डे जिंकला;इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव 

0
नॉटिंगहॅम- सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या १८व्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने भारतासमोर ठेवलेले २६९ धावांचे आव्हान भारताने ४०.१ षटकांमध्ये केवळ २ गडी गमावत पार करत सहज विजय मिळवला. सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक १३७ धावा केल्या. रोहितचे वनडे क्रिकेटमधील हे १८वे शतक आहे. कर्णधार विराट कोहलीने ७५ तर, शिखर धवनने ४० धावांचे योगदान दिले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरू झालेला इंग्लंडचा डाव ४९.५ षटकांमध्ये संपला . इंग्लंडने २६८ धावा केल्या. इंग्लंडसाठी बटलरने ५३ धावा केल्या. चमकदार कामगिरी करत भारताचा गोलंदाज कुलदीप यादव याने ६ बळी घेतले.
इंग्लंडमध्ये रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
रोहित शर्मान झंझावाती शतकी खेळी करत १३७ धावा केल्या. रोहित इंग्लंडमध्ये वनडेत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या उभारणारा फलंदाज ठरला. विराट कोहलीने २०११मध्ये वनडेत १०७ धावा केल्या होत्या. मात्र आजच्या सामन्यात रोहितने विराटला मागे सारले आहे.
कुलदीप ठरला ६ बळी मिळवणारा पहिला फिरकी गोलंदाज 
भारत विरुद्ध इंग्लड दरम्यानच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा हा विजयाचा कळस झाला, तर सहा बळी मिळवणारा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हा पाया ठरला. विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये ६ बळी मिळवणारा तो पहिला फिरकी गोलंदाज ठरला.