भारताने लंका जिंकली

0

कोलंबो । भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसर्‍या सामन्यात भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि 53 धावांनी पराभव करत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दुसर्‍या डावात फॉलोऑन मिळाल्यानंतर श्रीलंकेने 386 धावा केल्यामुळे त्यांना डावाचा पराभव टाळता आला नाही.चौथ्या दिवशी 16 धावांवर खेळणार्‍या पुष्पकुमाराचा त्रिफाळा उडवत अश्‍विनने भारताला चौथ्या दिवशी पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पुढच्याच षटकात जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलला (2) स्लिपमध्ये असलेल्या रहाणेकरवी झेलबाद करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली. उपहारानंतर जडेजाने करुणारत्ने 141 धावांवर खेळत असताना रहाणेकरवी झेलबाद केले.

जडेेजाच्या पाच विकेट्स
पुढच्याच षटकात जडेजाने 36 धावांवर खेळणार्‍या अँजेलो मॅथ्यूजला यष्टीरक्शक रिद्धिमान सहाकडे झेल देण्यास भाग पाडले. जडेजाने दिलरुवान परेराला (4) चकवल्यावर सहाने त्याला स्टंप आऊट करण्यात कुठली चूक केली नाही. त्यानंतर जडेजाने धनंजय डिसील्वाला रहाणेद्वारे झेलबाद करत वैयक्तिक पाचवी आणि श्रीलंकेची आठवी विकेट मिळवली. या पडझडीनंतर 31 धावांवर खेळणारा डिक्वेला हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेच्या हाती झेल देऊन बाद झाला. अश्‍विनच्या गोलंदाजीवर नुवान प्रदीपने मोठा शॉट खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी तो शॉट थेट शिखर धवनच्या हातात जाऊन विसावला आणि भारताला एक डाव 53 धावांनी विजय मिळाला.