भारताला उपविजेतेपद

0

लंडन । लॉर्डसवर झालेल्या अत्यंत चित्तथरारक अशा पध्दतीने रंगलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतीय संघावर नऊ धावांनी मात करत विश्‍वविजेतेपद पटकावले. इंग्लंडने आधी फलंदाजी करतांना 50 षटकात 7 बाद 228 अशी धावा संख्या उभारली होती. याला उत्तर देतांना भारतीय संघाने सर्वबाद 219 धावा केल्या या माध्यमातून भारतीय महिलांनी प्रथमच विश्‍वविजेतेपद मिळवण्याची संधी पुन्हा हुकवली. भारतीय संघाने या संपूर्ण विश्‍वचषकात अतिशय उत्तम दर्जाचे प्रदर्शन करून रसिकांची मने जिंकली. विशेष करून उपांत्य फेरीतील सामन्यातील दणदणीत विजयाने संघाचा आत्मविश्‍वास मोठ्या प्रमाणात उंचावला होता. यामुळे अंतिम सामन्यातही भारताच ‘हॉट फेव्हरिट’ मानला जात होता. मात्र रसिकांचा हा आत्मविश्‍वास फोल ठरला. याआधी 2005 साली भारतीय महिलांनी अंतिम फेरी गाठली होती. मात्र तेव्हा विजयाने हुलकावणी दिली होती. मात्र यानंतर तब्बल एक तपानंतर मिळालेल्या संधीचे सोने करण्यात अपयश आल्याने पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

टिच्चून गोलंदाजी
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने उत्तम गोलंदाजी करून इंग्लंडला 228 धावांमध्ये रोखले. प्रारंभी पुनमने टॅमी बेमाँट (23 धावा) आणि कर्णधार हेदर नाईटला (1 धाव ) माघारी धाडले. मात्र शेवटी टेलर (45 धावा) व नताली या जोडीने तब्बल 86 धावांची भागीदारी केली. झुलन गोस्वामी आणि शिखा पांडेनी यांनी अचूक गोलंदाजी करत सलामीच्या फलंदाजांना जम बसू दिला नाही. मात्र कॅथरीन ब्रन्ट 34 धावा व जेनी गुन्न 25 धावा यांच्यामुळे इंग्लंडला 228 अशी समाधान समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले. भारतातर्फे झुलन गोस्वामीने 23 धावा देत 3 तर पूनम यादवने 36 धावा देत 2 फलंदाजांना बाद केले तर राजेश्‍वरी गायकवाड हिने 10 धावा देत एकाचा बळी घेतला. यात झुलन ने 3 तर राजेश्‍वरीने 1 षटक निर्धाव केले.

डाव गडगडला
भारतीय संघाला विजयासाठी 229 धावांचे मिळालेले आव्हान हे अवाक्यातील समजले जात होते. मात्र स्मृती मंधाना शून्य तर कर्णधार मिताली राज ही अवघ्या 17 धावा करून तंबूत परतली. यानंतर पूनम राऊत आणि हरनप्रीत कौर यांनी डाव सावरला. तथापि हरनप्रीत ही 51 धावांवर बाद झाली तर पूनम राऊतही 86 धावा करून परतली. यानंतर वेदा कृष्णमूर्ती (35 धावा), सुषमा वर्मा (0धावा), दिप्ती शर्मा (14), झूलन गोस्वामी (0), शिखा पांडे (4) तर राजेश्‍वरी गायकवाड (0) हे गडी लागोपाठ बाद झाल्यामुळे भारतीय संघाचा डाव अवघ्या 219 धावांमध्ये संपुष्टात आला. इंग्लंडतर्फे अन्या श्रुबसोलने तब्बल सहा गडी बाद करत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. यामुळे अर्थातच इंग्लंडचे विश्‍वविजेतेपद साकारले.