न्यूयॉर्क – स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इव्हान स्पिगेल यांनी भारताबद्दल एका बैठकीमध्ये अनुचित उद्गार काढल्यामुळे भारतीयांनी स्नॅपचॅट अॅप अनइंस्टॉल करण्यास सुरुवात केली आहे. स्नॅपचॅट हे अॅप श्रीमंतांसाठी आहे. भारत आणि स्पेनसारख्या गरीब देशांमध्ये या अॅपचा विस्तार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही, असे 2015 साली झालेल्या एका बैठकीमध्ये इव्हान यांनी म्हटले होते. व्हरायटी या मॅगझिनने हे वृत्त दिले होते.
हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भारतामध्ये याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. जे लोक हे अॅप वापरत होते त्यांनी हे अॅप अनइंस्टॉल केले आहे तर जे लोक हे अॅप वापरत नव्हते त्यांनी सुद्धा स्नॅपचॅट हे अॅप आधी इंस्टॉल करून त्यास डाऊनग्रेड करून अनइंस्टॉल केले आहे. त्यामुळे स्नॅपचॅटच्या मानांकनात घसरण झाली आहे. भारत आणि स्पेनसारख्या मोठ्या बाजारपेठेत आपले अॅप म्हणावे त्या गतीने वाढत नाही, अशी चिंता एका बैठकीच्या वेळी इव्हान यांच्या सहकार्यांनी व्यक्त केली होती. आपल्याला गरीब देशांमध्ये विस्तार करण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी म्हटले होते.
त्यांच्या या बैठकीची माहिती उघड झाल्यानंतर भारतामध्ये अनइंस्टॉल स्नॅपSचॅट आणि बॉयकॉट स्नॅपचॅट असे ट्रेंड ट्विटरवर चालले. या वृत्तानंतर स्नॅपचॅटची गुगल प्ले स्टोअरवरील रेटिंग घसरली आहे. स्नॅपचॅटचे माजी कर्मचारी अँथनी पॉम्पलियानो यांनी स्नॅपचॅट विरोधात एक खटला दाखल केला आहे. त्यावेळी त्यांनी हा प्रकार उघड केला. स्नॅपचॅटच्या प्रसारासाठी आपल्या युजर्सची संख्या इव्हान यांनी फुगवून सांगितली होती, असे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. युजर्सच्या वैयक्तिक माहितीच्या नियंत्रणाबाबत आपण चिंता व्यक्त केली होती. त्यावरून आपले आणि कंपनीचे मतभेद झाले होते. त्याच वेळी आपण राजीनामा दिला होता, असे अँथनी यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, इंटरनेट वापराच्याबाबतीत भारत हा सर्वाधिक वेगाने वाढणारा देश आहे. 2020 पर्यंत भारतामध्ये इंटरनेट वापरणार्यांच्या संख्येत अडीच पट वाढ होणार आहे. भारतामध्ये स्नॅपचॅट वापरणार्यांची संख्या 40 लाख आहे. भारतामध्ये हे अॅप ट्विटर आणि फेसबुकच्या तुलनेत प्रसिद्ध नाही. इव्हान यांच्या वक्तव्याचा फटका कंपनीला बसला आहे.