भारताला चीनपेक्षा युद्धाचा अनुभव जास्त

0

रोटरी क्लब ऑफ चिंचवडतर्फेे शिशिर व्याख्यानमालेस प्रारंभ

पिंपरी-चिंचवड : ‘भारत आणि चीन या देशांमध्ये 1962 साली युद्ध झाले. त्यानंतर भारताने तीन युद्ध केली, त्या तीनही युद्धात भारताला विजय मिळाला आहे. मात्र, चीनने 1962 नंतर केवळ एकच युद्ध केले, त्यातही चीनचा पराभव झाला आहे. त्यामुळे भारताला चीनपेक्षा युद्धाचा अनुभव अधिक आहे. चीनने कितीही कुरघोड्या किंवा कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरी भारताला पराभूत करण्यासाठी चीनकडे मुबलक सैन्य आणि शस्त्र पुरवठा नाही’, असे मत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ चिंचवडची ‘शिशिर व्याख्यानमाला’ सुरू झाली. यामध्ये नेने बोलत होते. ‘भारताचे सख्खे शेजारी-चीन आणि पाकिस्तान’ असा त्यांचा विषय होता. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन होते. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा अनघा रत्नपारखी, मानद सचिव भूपिंदर सिंग जग्गी आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदा 21 वे वर्ष आहे.

चीन अंतर्गतच वाढते व्दंद
नेने म्हणाले, चीन त्यांच्या सर्व शेजारील राष्ट्रांवर वारंवार कुरघोड्या करीत आहे. त्यामुळे चीनचे सर्व शेजारी देश चीनबद्दल उदासीन आहेत. त्यामुळे चीनला एखाद्या देशाच्या सीमेवर सर्व सैन्य आणणे कठीण आहे. तसेच चीनमध्ये अंतर्गत द्वंद्व देखील वाढत आहे. पूर्व चीन काशघरमध्ये मुस्लिम दहशतवाद वाढत आहे. समुद्री मार्गातून चीनच्या व्यापारी मार्गावर कोंडी होईल या भीतीने पाकिस्तानमधून भूपृष्ठावरून वाहतूक सुरु केली. मात्र, हा मार्ग खूप उंचावरून असल्याने बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे या मार्गावरून सातत्याने वाहतूक करणे जोखमीचे ठरणार आहे.

पाकिस्तानची दुखरी नस बलुचिस्तान
पाकिस्तान बद्दल बोलताना नेने म्हणाले की, पाकिस्तानमध्ये अंतर्गत द्वेष आणि कुरघोड्या वाढत आहेत. बलुचिस्तान ही पाकिस्तानची दुखरी नस आहे. तिथे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात सुरक्षा द्यावी लागत आहे. भारतावर कुरघोड्या करण्यासाठी पाकिस्तानने काराकोरमचा भाग तसेच संपूर्ण पाकिस्तानमधून चीनला वाहतूक मार्गासाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे. पण त्यामुळे पाकिस्तानचे देखील मोठे नुकसान होणार आहे.

भारतीय सैन्य सक्षम : हेमंत महाजन
’भारत आणि शेजारील राष्ट्र’ याबाबत बोलताना ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन म्हणाले की, भारत आणि शेजारील देश याबाबत माध्यमांनी संभ्रमाची अवस्था पसरविली आहे. भारतीय सैन्य चीनशी लढण्यासाठी सक्षम आहे. पाकिस्तान आणि चीनने मिळून जो सिपॅक कॉरिडॉर बनविला आहे. त्याचा घातक परिणाम दोन्ही देशांवर होणार आहे. तसेच जेंव्हा आपण देशाने मला काय दिलं? असा प्रश्‍न उपस्थित करतो, तेंव्हा आपण देशाला काय दिलं? असा स्वतःबद्दल प्रश्‍न नेहमी नागरिकांच्या मनात पडला पाहिजे. व्यापारी व नागरिक आपल्या व्यवहारांमध्ये जोपर्यंत प्रामाणिकपणाची भावना आणत नाहीत, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. काश्मीर आणि डोकालाम या प्रश्‍नांबाबत नागरिकांनी संभ्रमात पडू नये, असे आवाहनही महाजन यांनी यावेळी केले.