भारताला दिलासा, डोपिंग प्रकरणात मिळाली क्लीन चिट

0

गोल्डकोस्ट । भारतीय खेळाडू राहात असलेल्या ठिकाणी सुया सापडल्यामुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडलेल्या भारतीय पथकाला दिलासा मिळाला. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने भारतीय बॉक्सर्संना डोपिंगप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. तथापि, स्पर्धेदरम्यान कुठल्याही प्रकारची सुई (इंजेक्शन) सोबत ठेवू नये, या नियमांतर्गत भारतीय खेळाडूंवर नजर राहणार आहे. या स्पर्धेत कोणत्याही पद्धतीने सुयांचा वापर होणार नाही (नो नीडल पॉलिसी), असे कठोर धोरण असल्यामुळे संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. खरे तर, या सार्‍या प्रकरणात कोणत्या देशाचा संबंध आहे, हे स्पष्ट करण्यात आले नसले तरी भारतीय बॉक्सर्स केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे.जिथे भारतीय खेळाडूंसह इतर देशांचेही खेळाडू राहतात, त्याच परिसरात या सुया सापडल्या होत्या. भारतीय पथकाने मात्र आपल्याकडून कोणतेही चुकीचे पाऊल
उचलले गेले नाही, असे स्पष्ट केले होते.

पैसे भरुनही गोलकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेच्या ठिकाणी वडिलांना प्रवेश नाकारल्याने बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटरवर तिने याबाबतचे ट्वीट केले आहे. सायना नेहवालने सांगितले की, 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये विशेष अधिकारी म्हणून माझ्या वडिलांचा समावेश करण्यात आला होता. मी त्यासाठी पैसेही भरले होते. मात्र, ऑस्ट्रेलियात आल्यावर गोल्डकोस्ट गावामध्ये वडिलांना प्रवेश नाकारण्यात आला. आता माझे वडील मला स्पर्धे दरम्यान भेटू शकणार नाही, ते माझ्या सोबत राहू शकणार नाही. तसेच त्यांना माझे सामनेही पाहता येणार नाही. यापूर्वी क्रीडा मंत्रालयाने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी बॅडमिंटन संघात अतिरिक्त अधिकारी म्हणून सायनाचे वडील हरविरसिंग नेहवाल यांचे नाव असल्याचे जाहीर केले होते. सायनाने आपली दखल घेण्यात यावी म्हणून आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रकुल क्रीडा महासंघालाही टॅग केले आहे. मला वडिलांच्या समर्थनाची अपेक्षा होती. कारण मी नेहमी माझ्या स्पर्धांमध्ये त्यांना घेऊन जाते. पण मला हे सर्व कोणी आधी का कळविले नाही? असा प्रश्‍नही सायनाने विचारला आहे.