नवी दिल्ली । स्लोव्हेनिया ज्युनिअर-कॅडेट ओपन भारताच्या युवा पॅडलर्सनी चमकदार कामगिरी करत मुलांच्या ज्युनियर सांघिक गटात सुवर्णपदक व रौप्यपदक मिळवले तर, मुलींच्या कॅडेट गटात रौप्यपदकाची कमाई केली. भारताच्या मुलांच्या अ संघाने चायनीज तैपेईला नमविले तर, भारताच्या ब संघाने थाई-अमेरिकेच्या संघाला पराभूत केले. त्यामुळे भारताचे दोन्ही संघ अंतिम फेरीत एकेमकांसमोर होते. मुलांच्या भारतीय ब संघाचे नेतृत्व स्नेहीत सूरवाजुला याच्याकडे होते त्याच्यासोबत पार्थ विरमानी आणि अनुक्रम जैन यांचा समावेश असलेल्या संघाने जित चंद्रा, मानव ठक्कर आणि मनुष शाह यांचा सहभाग असलेल्या भारतीय अ संघाचा 3-2 असा पराभव केला.
भारतीय ब संघाकडून स्नेहीत सुरवाजुला याने जित चंद्राला 3-2 (11-6, 7-11, 11-6, 2-11, 11-8) सुरुवातीच्या एकेरीच्या सामन्यात नमविले.पार्थ विरमानीला मानव ठक्करने 0-3 (6-11, 4-11, 9-11) असे पराभूत केले. यानंतर ब संघाच्या अनुक्रम जैनला तिसर्या एकेरीच्या सामन्यात 1-3 (11-7, 6-11, 9-11, 10-12) असे पराभूत व्हावे लागले.पण, परतीच्या एकेरी सामन्यात भारतीय ब संघाने चमक दाखवली. स्नेहीत ने मानवला 3-2 (11-9, 8-11, 4-11, 11-8, 11-5) असे पराभूत केले.निर्णायक सामन्यात विरमानीने जित चंद्राला 3-2 (5-11, 11-6, 11-8, 8-11, 11-6) असा विजय मिळवला.
भारताच्या मुलींनी कॅडेट गटात दिया चितळेच्या नेतृत्वाखाली कोरिया प्रजासत्ताक ब संघाचा उपांत्यफेरीत 3-1 असा पराभव केला. अंतिम सामन्यात चायनीज तैपेईने भारताला चुरशीच्या लढतीत 2-3 असे पराभूत केले.भारताच्या मुलींची सुरुवात चांगली झाली नाही त्यांच्या वंशिका भार्गवला फोंग एन चाई कडून 1-3 (5-11, 12-14, 11-8, 7-11) असे पराभूत व्हावे लागले. दिया चितळेने सी झूआन चेनला 3-0 (11-7, 13-11, 11-8) असे नमविले. यानंतर दिया आणि कुंडू मूनमून जोडीला फोंग एन काई व सी झुआन शेन जोडीकडून 3-0 (11-4, 11-9, 11-6)असे पराभूत व्हावे लागले. दियाने फोंग एन चाईला 3-1 (5-11, 11-4, 11-5, 11-4) पराभूत केले.वंशिका भार्गवला सी झुआन शेनकडून 1-3 (6-11, 11-9, 7-11, 6-11) पराभूत व्हावे लागल्याने संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.