कोलकाता । ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात भारत दौर्यावर येत आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाने अनेकवेळा भारतीय संघाला हरवले आहे. पण यावेळी मात्र त्यांच्यासमोर भारतीय संघाचे कठिण आव्हान असेल असा विश्वास भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केला. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीमुळे भारत दौर्यावर येणार नाही. पायाला झालेल्या दुखापतीमुळे स्टार्क संघातून बाहेर गेला आहे.
सौरव गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्श असून, 21 सप्टेंबर रोजी कोलकात्यातील इडन गार्डनवर उभय संघामधील सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या तिकीट विक्रीबाबत बोलताना गांगुलीने तिकीटांचे दर वाढवणार नसून मात्र, त्यावर 28 टक्के जीएसटी लावणार असल्याचे स्पष्ट केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेला 17 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघ सध्या श्रीलंकेत एकदिवसीय क्रिकेट सामन्याची मालिका खेळत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगला देशाच्या दौर्यावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ रविवारी बांगलादेशात दाखल झाला आहे बांगलादेशातील कसोटी सामने फतुल्लाह, मिरपुर आणि चितगाव येथे खेळवण्यात येतील.
भारताचे पारडे जड
ऑस्ट्रेलियाचा संघ स्टार्कशिवाय बांगलादेश आणि भारताच्या दौर्यावर आला आहे. याशिवाय भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. या दोन कारणांमुळे भारतीय संघाला हरवणे ऑस्ट्रेलियाला कठिाण जाईल असे गांगुलीला वाटते. मागील काही मालिकांमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यानंतर भारताने विंडीजला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत हरवले होते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे भारताचे पारडे जड असल्याचे गांगुली म्हणाला.