मेलबोर्न : भारताविरुद्ध होणारी चार कसोटींची मालिका आव्हानात्मक होणार आहे. यात आम्ही विजय साजरा केल्यास आमच्या संघाची ऐतिहासिक कामगिरी ठरेल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने म्हटले आहे. यंदाच्या मालिकेत विजयाचा विश्वास स्मिथने व्यक्त केला असून भारतातील यशाने आमचा संघ सर्वकालीन महान म्हणून गणाला जाईल, असेही स्मिथला वाटते.
पुण्यातील कसोटीतून प्रारंभ
23 फेब्रुवारीपासून या मालिकेस पुण्यातील कसोटीतून प्रारंभ होत आहे. ‘या मालिकेतील यश आम्हाला त्यानंतर इंग्लंडमध्ये होणार्या अॅशेस मालिकेतही चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देईल. मालिका बरोबरीत राहिली, तर आमचे खूप मोठे यश असेल. सध्या आम्ही निकालाचा विचार न करता केवळ सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर देणार असल्याचे स्मिथने म्हटले आहे. स्मिथला फिरकीविरुद्ध सर्वोत्तम फलंदाज मानले जाते. त्यामुळे या दौर्यात मोठी जबाबदारी असल्याची जाणीवदेखील त्याला आहे. ‘फिरकी खेळताना काय करावे आणि काय करू नये, याचा मला चांगला अभ्यास आहे. त्यामुळे भारतात मोठी धावसंख्या उभारण्यास अडचण येणार नाही, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. कोणत्याही कर्णधारासाठी आपल्यातील क्षमता सिद्ध करायची असल्याच भारतात खेळणे सर्वोत्तम असल्याचेही स्मिथने म्हटले आहे.