रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेची नोंद
नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वत रांगातील जर्म शहरापासून 35 किलोमीटरवर आलेल्या 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे भारतासह अफगाणिस्तान व पाकिस्तान चांगलेच हादरले. 191.20 किलोमीटर इतकी या भूकंपाची केंद्रबिंदूस्थित खोली होती. राजधानी नवी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत, काश्मीर, पेशावर, क्वेट्टा, कराची, लाहोर, इस्लामाबाद या शहरांना भूकंपाचे जोरदार धक्के बसले. बलुचिस्तान, पाकिस्तानात तिघांचा मृत्यू झाला असून, काहीजण जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. भारतातही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. पंजाब, हरियाणा, पुंछ आणि हिमालयात या धक्क्यांची तीव्रता जास्त होती.
जीवितहानी पेक्षा वित्तहानी मोठी
तब्बल दिडशे वर्षानंतर पूर्ण चंद्रग्रहणाचे वेध सुरु झाले असतानाच तीन देश जोरदार भूकंपाच्या धक्क्याने हादरले. 12 वाजून 40 मिनिटांनी आलेल्या भूकंपानंतर नागरिकांनी तातडीने खुल्या मैदानात धाव घेतली. अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हे (युएसजीएस)ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणमधील हिंदुकुश पर्वत रांगात होता. त्यामुळे त्याची तीव्रता फारशी जाणवली नाही, तसेच मोठी वितहानीही टळली. हिंदुकुश पर्वत रांगात सातत्याने भूकंप होत असून, यापूर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये तब्बल 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. त्यात जवळपास सुमारे 380 नागरिकांचा बळी गेला होता. त्यात 248 पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता तर 1600 जण गंभीर जखमी झाले होते. बुधवारी आलेल्या भूकंपात जीवितहानी फारसी झाली नसली तरी पाकिस्तान व बलुचिस्तानमध्ये तीन बळी गेले आहेत. तर भारतात मोठ्या प्रमाणात मालमत्तांची हानी झाली आहे.
40 सेकंद जाणवले धक्के
उत्तर भारतात सुमारे 40 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे चोहीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंप झाल्यानंतरही बराचवेळ नागरिक घरात गेले नाहीत. बलुचिस्तानातील लासबेला येथे भूकंपामुळे घराचे नुकसान झाले व एका बालिकेचा बळी गेला. आणखी नऊजण जखमी झाल्याची माहिती आहे. श्रीनगरमध्ये भूकंपामुळे पळापळ उडाली. जीवितहानीचे वृत्त नसले तरी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती व धावपळ उडाल्याचे चित्र चोहीकडे दिसून आले.