भारतासाठी करो या मरो मुकाबला

0

डर्बी । सलगच्या दोन पराभवांमुळे आत्मविश्‍वास खचलेल्या भारतीय महिला संघाचा शनिवारी न्यूझीलंडशी सामना होणार आहे. विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे. सामना गमावल्यास आव्हान संपणार हे निश्‍चित असल्यामुळे भारतीय संघासाठी ही लढत करो या मरो असणार आहे. सलग चार विजय मिळवणार्‍या भारतीय संघाला बुधवारी झालेल्या सामन्यात सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारताला आठ विकेट्सनी हरवले. राऊतचे शतक मितालीची विक्रमी 69 धावांची खेळीही भारताचा पराभव टाळू शकली नाही.

पहिली ऑलिम्पियन
न्यूझीलंडची कर्णधार सूजी बेट्स आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे. बेट्सने 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे बास्केटबॉलमध्ये प्रतिनिधीत्व केले होते. एखाद्या ऑलिम्पिक क्रीडापटूने क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. बेट्स शिवाय 16 वर्षीय लेगस्पिनर अमेलिया केरही भारतासाठी धोकादायक ठरु शकते. या विश्‍वचषक स्पर्धेत फलंदाजी भारतीय संघाची मुख्य ताकद आहे. पण मागील दोन सामन्यांमध्ये फलंदाजांमुळेच सामने गमावण्याची वेळ भारतीय संघावर आली. मोठी धावसंख्या नसल्यामुळे गोलंदाजही दडपणाखाली होते. चेंडूला चांगली उंची देणार्‍या गोलंदाजांमुळे यष्टीचीत करणे भारतासाठी फायदेशीर ठरले आहे.