भारतासोबत राहायचे असेल तर पाकने भारताप्रमाणे धर्मनिरपेक्ष व्हावे-लष्करप्रमुख

0

नवी दिल्ली- पाकिस्तानने स्वत:ला इस्लामिक राष्ट्र बनवले आहे. पाकिस्तानला भारतासोबत राहायचे असेल तर त्यांना धर्मनिरपेक्षता स्वीकारावी लागेल असे विधान लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज केले.

भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. पाकिस्तान स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणवत असेल तर एकत्र राहणे कसे शक्य आहे ? असा सवाल रावत यांनी केला. एकत्र राहण्यासाठी दोन्ही देश धर्मनिरपेक्ष असले पाहिजेत. पाकिस्तान धर्मनिरपेक्षता स्वीकारणार असेल तर काही संधी आहे असे मला वाटते असे रावत म्हणाले.

पाकिस्तानला भारतासोबत चांगले नागरी संबंध हवे आहेत. दोन्ही देशांमध्ये काश्मीर हा एकमेव मुद्दा आहे. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. भारताने एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पावले पुढे टाकू असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कर्तारपूर मार्गिकेच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात म्हणाले होते.

जम्मू-काश्मीरचा उल्लेख करुन इम्रान खान यांनी चांगल्या धार्मिक कार्यक्रमात राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारताने खेद व्यक्त केला होता. पाकिस्तानबरोबर चर्चा आणि कर्तारपूर कॉरीडोर या दोन वेगवेगळया गोष्टी आहेत हे भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आधीच स्पष्ट केले आहे.