मुंबई | भारतातील करबुडवे व काळे धन असलेल्यांसाठी आजवर स्वित्झर्लंड स्वर्ग म्हणून ओळखले जात होते. आता ही परिस्थिती बदलत आहे. आता भारतीयांचे काळे धन हॉंगकॉंग, मकाऊ, सिंगापूर, बहारिन, मलेशिया यासारख्या देशांत गुंतवले जात आहे. भारतीयांच्या एकूण काळ्या पैशांपैकी 53 टक्के पेक्षा जास्त या देशांत पडून आहे. स्वित्झर्लंडमध्ये तुलनेने हे प्रमाण कमी, 31 टक्के आहे. विदेशी निधीचे विश्लेषण करणाऱ्या बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हे तथ्य समोर आले आहे. ही बँक आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या देव-घेवीच्या व्यवहारांच्या डेटाचा मागोवा ठेवते. तथापि, हा डेटा जारी करताना, बँकेने हा डेटा कोणत्या देशाने तयार केला, ते उघड केलेले नाही.
भारताच्या फक्त घोषणाच…
इंटरनॅशनल सेटलमेंट बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते की परकीय बँकांमध्ये असलेले पैसे परत आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना फारसे यश आलेले नाही. भारतीयांच्या देशाबाहेर गुंतवलेल्या काळ्या पैशांतील एकूण 89 टक्के रक्कम 2007 साली स्विस बँकेत होती. 2015 च्या आकडेवारीनुसार, भारतीयांचे सुमारे 4 लाख कोटी रुपये परदेशी बँकांमध्ये पडून आहेत. भारताच्या ‘जीडीपी’च्या तुलनेत 3.1 टक्के इतके हे प्रमाण आहे.
आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, जगभरच्या देशातील एकूण 8.6 खरब डॉलर धन परदेशी बँकांत पडून आहे. जगाच्या एकूण ‘जीडीपी’च्या तुलनेत ही रक्कम 11.6 टक्के आहे. 2007 नंतर, काळा पैसा देशाबाहेर नेण्यात 54 टक्के वाढ झाली आहे. या मालमत्तेत रिअल इस्टेट आणि इतर संपत्तीचा समावेश नाही.
चीनही काळ्या धनाच्या संकटात
स्वित्झर्लंडने पारदर्शकता स्वीकारल्यानंतर तसेच पनामा पेपर लीक झाल्यानंतर करबुडवे व काळे धनवाले स्वित्झर्लंडमध्ये पैसा ठेवत नाहीत. आता हाँगकाँगसारख्या देशांमध्ये काळे धन साठविले जात आहे. चीनही काळ्या धनाच्या संकटात सापडलाय. चीनमधील नागरिकांचे 287 अब्ज डॉलर परकीय बँकांमध्ये पडले आहेत. 2015 च्या आकडेवारीनुसार, ही रक्कम चीनच्या ‘जीडीपी’च्या 2.4 टक्के इतकी आहे.