भारतीयांचे प्रेम मित्र, नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनवरच जास्त

0

मोटोरोला, हॉवर्ड विद्यापीठाचा एकत्रित सर्व्हे

मुंबई : मोबाइल प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक ठरला आहे. गरज म्हणून वापरण्यात येणारा मोबाइल आता व्यसन झाला आहे. एका सर्व्हेनुसार, तंत्रज्ञानाचा फास इतका आवळला आहे की लोक नात्यांपेक्षा मोबाइलला जास्त महत्व देऊ लागले आहेत. लोक आजकाल मित्र आणि नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनवर जास्त प्रेम करतात, असे धक्कादायक निरिक्षण या अहवालात नोंदविण्या आले आहे. सुमारे 33 टक्के लोकांचा जन्म डिजीटल युगात झाला असून यामध्ये युवकांची संख्या सर्वाधिक आहे. हे लोक मित्र, नातेवाईकांपेक्षा स्मार्टफोनला महत्व देतात. भारतात हे प्रमाण सर्वाधिक आहे. मोटोरोलाने हॉवर्ड विद्यापीठासोबत मिळून हा सर्व्हे केला आहे.

भारताचा इतर देशांच्या तुलनेत पुढे
50 टक्के लोक सकाळी उठल्या उठल्या मोबाइल फोन हातात घेतात. याबाबतीतही भारत इतर देशांच्या तुलनेत पुढे आहे. 35 टक्के लोकांनी स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त वेळ वाया घालवत असल्याचे मान्य केले आहे. यातील जवळपास 44 टक्के लोकांचा जन्म 1990 ते 2000 दरम्यान झाला आहे.

नात्यांमध्ये दुरावा आल्याचेही मान्य
या सर्व्हेत सहभागी झालेल्या 50 टक्के लोकांनी स्मार्टफोन जवळचा मित्र असल्याचे म्हटले आहे. स्मार्टफोन आणि दैनंदिन आयुष्याचा समतोल राखण्याची इच्छा असणार्‍यांमध्येही भारताचा वरचा क्रमांक आहे. सुमारे 64 टक्के भारतीयांनी दैनंदिन आयुष्य आणि स्मार्टफोन वापरात समतोल राखला जावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे नात्यांमध्ये दुरावा आल्याचेही अनेक नागरिकांनी मान्य केले आहे.