भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत

0

जैेन उद्योग समूह तथा अनुभूती निवासी इंग्लीश मीडियम स्कूलचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अनुभूती स्कूलच्यावतीने 1 ते 3 फेब्रुवारी 2017 दरम्यान ‘स्वरानुभूती’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुभूति स्कूल, एम्पी थिएटर, जैन डिव्हाईन पार्क येथे सायंकाळी 6 ते रात्री 8 दरम्यान हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात भारतातील विविध प्रांतातील नामांकित युवा कलाकारांचा सहभाग असून अनुभूति स्कूलच्या संगीत कला विभागातील शिक्षक सहकारीदेखील आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. या निमित्ताने अनुभूती शाळेचे संगीत शिक्षक निखील क्षीरसागर यांनी भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा घेतलेला हा माहितीपर आढावा.

संगीत या क्षेत्रात ‘जन-चित्त-रंजक-ध्वनी विशेष’ यांची प्रतिष्ठा आहे. राग या शब्दाचा उगम ‘रंञ्ज’ या धातुपासून आहे. पुढे राग हा शब्द प्रचलित झाला. राग या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे. म्हणजेच रंगून जाणे असा होय. अर्थातच राग हा रसिकांना प्रेमानुभूती देऊन जातो. भारतीय दर्शन, साहित्य आणि संगीत यात रागाला विशेष असे स्थान आहे. रागाचे संपूर्ण सौंदर्य हे स्वरांवर आधारित आहे व प्रत्येक स्वराला एक विशिष्ठ रस आपल्या संगीत शास्त्रकारांनी आपल्या स्वानुभवातून जाणला आहे. उदा. षड्ज (सा) हा शांती रस प्रधान आहे. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात ‘षड्ज’ या स्वराला अनन्यसाधारण महत्व आहे. षड्ज हाच सहा स्वरांना निर्माण करतो म्हणून त्याला ‘षड्ज’ असे म्हणतात. म्हणजेच सहा स्वरांना जन्म देणारा म्हणूनच शास्त्रकारांनी याला ‘षड्ज’ असे नाव दिले आहे.

योग्य गुरुंच्या मार्गदर्शनाखाली व वर्षानुवर्षांच्या रियाजानंतर एक खरा कलाकार जन्माला येत असतो. संगीताचा रियाज हा अत्यंत कठीण व अंत्य पाहाणारा असतो. कारण एखाद्या गायकाला ताल व लय यांची योग्य सांगड घालता आली पाहिजे. त्याला रागांवर प्रभुत्व प्राप्त करता आले पाहिजे व रसिकांना एकाजागी खिळवून ठेवता आले पाहिजे. आजही आपण आपल्या जुन्या पीढीतील लोकांडून ऐकतो की, संगीताच्या मैफिली रात्र-रात्र भर चालत असे व कलाकार एक राग दोन-दोन तास गात असे. पहाटे राग भैरवी ने संगीत मैफलीची सांगता होत असे. एखाद्या कलाकाराला आजच्या काळात हे साध्य करणे म्हणजे एव्हरेस्ट शिखर चढण्यासारखे होय.

संगीत ही साधना म्हणवली जाते. आज वैज्ञानिक निरनिराळ्या रागांवर संशोधन करत आहेत. रागांद्वारे अनेक रोगांवर उपचार घेण्यात येत आहेत. कारण प्रत्येक स्वर हा आपल्या शरीर आणि मनावर प्रभाव पाडत असतो. हर्ष, विशाद, प्रेम, घृणा, वात्सल्य, शौर्य, दया व शांती हे सर्व भाव स्वरांच्या अनुषगांने रागांमध्ये उतरवले जातात. संगीतातील प्रत्येक राग कुठल्या ना कुठल्या रसाशी संबंधीत आहे. उदा. राग ‘हंसध्वनी’ हा विररस प्रधान आहे. तर, राग ‘मालकंस’ हा शांत रस प्रधान आहे. राग ‘वसंत’ हा वसंतऋतु गायला जाणारा हर्षोउल्हास निर्माण करणारा आहे. राग ‘मेघ’ हा वर्षाऋतुच्या आगमनाने मन आनंदीत करणारा आहे व राग ‘भैरवी’ हा मनात प्रेम व भक्तीची भावनीक अभिव्यक्त करणारा आहे.

संगीत या क्षेत्रात ‘घराना’ हा शब्द अति परिचित आहे. ‘घराना’ याचा अर्थ एका विशिष्ठ स्थानावर प्रचलित अथवा व्यक्तिद्वारा प्रवर्तित संगीताची रिती म्हणूनच घराण्याचे नामकरण व्यक्ति अथवा स्थानानुसार होत असते. काही घराण्यांमध्ये कलाकार आलापांना स्थान देऊन रागाला गंभीरतेने गातात तर काही घराण्यांमध्ये नोम-तोम् या सारखे शब्द घेऊन एक वेगळ्या पद्धतीने राग गायन करतात. ‘ग्वाल्हेर’ घराना’ हे सगळ्या घराण्यांना जन्म देणे होय व सर्वात पुरातन घराणे आहे. यात बुलंद आवाज लावणे, आकारयुक्त तान घेणे, जास्तीत जास्त विलंबित व मध्यलयीत गायन करणे इत्यादी ‘पं. ओंकारनाथ ठाकुर’ हे ग्वाल्हेर घराण्याचे एक प्रसिद्ध गायक होते. ग्वाल्हेर घराण्यानंतर किराणा, जयपूर, दिल्ली, बनारस, रामपूर साहस्वान, श्याम चौरसिया, पतियाळा इत्यादी घराणे प्रसिद्धीस आले. प्रत्येक घराण्यात एक विशिष्ठ गायक व त्याची वंश परंपरा आणि शिष्य परंपरा आजही चालत आली आहे.

भारतीय संगीत हे अनादी काळापासून चालत आले आहे. संगीतातला सर्वप्रथम ग्रंथ महर्षी भरत रचित ‘नाट्यशास्त्र’ हा होय. यामध्ये संगीत म्हणजेच गीत वाद्य व नृत्य ह्या तीघांची सविस्तर माहिती आहे. नंतरच्या काळामध्ये अभिनव गुप्त, नारदमुनी, नंदीकेश्वर, कोहल, मतंग इत्यादी विद्वानांनी संगीत हे शास्त्रबद्ध केले. ‘खयाल गायकींच्या ही आधी धृपद गायकी’ व त्याही आधी प्रबंध गायकी व त्याही आधी ‘धृवा व ‘देशी’ गान प्रचलित होते. असे म्हणतात की, भगवान शंकराच्या डमरुतून स्वरांची उत्पत्ती झाली आहे. भगवान शंकराचे ‘तांडव’ नृत्य व देवी पार्वती ने ‘लास्य’ नृत्य यांचा आविष्कार केला. ‘सामदेव’ हा वैदीक ऋचा कशा गाव्या हे सांगतो. उदात्त, अनुदात्त व स्वरित हे पुराण काळात स्वरांना दिलेली नावे होती. मध्ययुगामध्ये सर्व उत्तर भारतावर मुसलमानी साम्राज्य स्थापित झाले व त्यांच्या संस्कृतीचा प्रभावही भारतीय संस्कृतीवर पडला. धृपद गायकी संपून खयाल गायकी जास्त लोकप्रिय झाली.

उत्तर हिंदूस्थानी व दक्षिण हिंदूस्थानी संगीत अशा संगीताच्या दोन वेगवेगळ्या शैली निर्माण झाल्या. उत्तर हिंदूस्थानी संगीतामध्ये खयाल गायकी, ठुमरी गायन, तराना गायन, टप्पा, गझल, सूफी तर, दक्षिण हिंदूस्थानी संगीतामध्ये किर्तनम्, पद्म, जावली इत्यादी आजही प्रचारात आहे. जुन्या काळात राजे-महाराजांच्या काळात संगीत कला ही राजाश्रयी होती. मोठ-मोठ्या दरबारांमध्ये गायक, वादक व नृत्यकार आपली कला सादर करीत असत. त्या काळात प्रत्येक कलाकारांत स्पर्धेची भावना असे कारण राज दरबारी कलाकाराला मान-मरातब व पैसा, सुख सोयी मिळतो असे. तर, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पंडीत भातखंडे’ यांनी संगीताची एक नवी लिपी तयार करुन व ‘गांर्धव महाविद्यालयाची स्थापना करुन संगीत हे संस्थागत प्रणालीमध्ये स्थापित केले. नंतरच्या काळात सरकारनेही ललित कलेला विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षणात समाविष्ट करुन संगीताला विशिष्ठ असा वेगळा दर्जा मिळवून दिला. कॉम्प्युटर व इंटरनेटमुळे आज आपण हवे असेल त्या कलाकारांना ऐकू व पाहू शकतो. संगीतामध्ये नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. ज्याला आपण फ्युजन, परकशन, रिमिक्स असे म्हणतो. नवीन पिढीला या सगळ्यामुळे खूप मोठा फायदा होत आहे. नवीन पिढी संगीताकडे वळू लागली आहे. एवढे असूनसुद्धा संगीताचे
शिक्षण घेण्यासाठी गुरु-शिष्य परंपरा हीच योग्य आहे. हा माझा स्वानुभव आहे.

निखिल क्षिरसागर 9822921109