तळेगाव दाभाडे : सध्यस्थितीमध्ये भारतीय अभियंत्यांना जपानमध्ये मोठी संधी आहे. जपानमधील या संधीसाठी भारतीय तरुण उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन एससीसीआयपी जपानचे चेअरमन रेन्या किकुची यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या एनसीईआर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. याप्रसंगी एलएससीएल रोबोटिक्सचे सीईओ प्रकाश डेव्हिड, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, प्रा. शिवानंद आदी उपस्थित होते. जपानमधील वेळेचे महत्त्व, जपानी कार्यसंस्कृती तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या विषयी देखील किकूची यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
हे देखील वाचा
परदेशी भाषा शिकण्याचे महत्त्व
प्रकाश डेव्हिड यांनी परदेशी भाषा शिकण्याचे महत्त्व, जपानसारख्या देशातील नोकरीच्या संधी आणि जपानमधील भारतीयांसाठीची सध्याची अनुकूल स्थिती याविषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. देसाई यांनी नूतन संस्थेच्या परदेशी भाषा संदर्भांत धोरणांची माहिती याप्रसंगी दिली. संस्थेतील विद्यार्थी जपानी भाषेचे प्रशिक्षण घेत असून आगामी काळात नूतन संस्थेच्या विद्यार्थ्यांना परदेशातील नोकरीच्या संधी आम्ही देणार आहोत, अशीही माहिती देसाई यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अर्चना येवले, प्रा. राधा देवघरे , प्रशांत सुतार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. शिवानंद यांनी व्यक्त केले.