भारतीय अभियंत्याची अमेरिकेत हत्या

0

कॅन्सस सिटी (अमेरिका): हैदराबादच्या एका अभियंत्याची बुधवारी रात्री अमेरिकेतील कॅन्सस शहरातील एका बारमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, हल्लेखोर गोळी झाडण्यापूर्वी गेट आऊट ऑफ माय कंट्री (माझ्या देशातून चालता हो) असे ओरडत होता. या घटनेत या अभियंत्याचा मित्र जखमी झाला असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अभियंत्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

श्रीनिवास कुचिभोतला (वय 32), असे मृत्यमुमुखी पडलेल्या अभियंत्याचे नाव आहे. त्याच्या जखमी सहकार्‍याचे नाव आलोक मदासनी आहे. आरोपीची ओळख पटली असून, अ‍ॅडम प्यूरिंटन (वय 51) असे त्याचे नाव आहे. प्यूरिंटन हा अमेरिकन नौदलाचा माजी कर्मचारी आहे. ही घटना बुधवारी सांयकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. त्या वेळी प्यूरिंटन नशेत होता. तो वारंवार वाशिंक टिप्पणी करत होता. बारमधील एका कर्मचार्‍याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, माझ्या देशातून चालता हो, असे म्हणत त्याने श्रीनिवास आणि त्याच्या मित्रावर गोळ्या झाडल्या.

मृत श्रीनिवास हा मूळचा हैदराबादचा होता. तो अमेरिकेतील एका एव्हिएशन कंपनीत कामाला होता. त्याने 2005 मध्ये जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठातून इलेक्ट्रिकलमधून अभियंत्याची पदवी, तर टेक्सास अल पासो विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली होती.