नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने मोडून काढण्यासाठी अनेक आघाड्यांवर जोर देण्याची गरज आहे, अशी कबुली भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी दिली आहे. गेल्या सप्टेंबरपासून भारतात आर्थिक मंदी असल्याचे एसबीआयने अहवालात म्हटले होते, या पार्श्वभूमीवर सब्रमण्यम यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया महत्वाची ठरते. आपण अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज आहोत, असे सुब्रमण्यम म्हणाले.
आपल्यासमोर पुढील काळात अनेक आव्हाने आहेत. विकासाची गती मंदावल्याचे आपण पाहत आहोत. गुंतवणूकही सुस्तावली आहे. सरकार यावर काम करत आहे. अनेक आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. जगातील सर्वच देशांसमोर आव्हाने आहेत. अनेक देश त्यावर उपाय शोधत आहेत, असेही ते म्हणाले. सुब्रमण्यम यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाची मुदत 16 ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे. मात्र, सरकारने त्यांना एका वर्षाचा कार्यकाळ वाढवून दिला आहे.