न्यूयॉर्क: अमेरिकेत गेल्या आठवड्यात भारतीय अभियंत्याच्या झालेल्या हत्येची घटना ताजी असतानाच भारतीय वंशाच्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना राज्यातील लँकेस्टर शहरात भारतीय व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हर्नीश पटेल असे या व्यावसायिकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री उशिरा पटेल यांची त्यांच्या घरासमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पटेल रात्री आपले दुकान बंद करुन घरी जात असताना ही घटना घडली. स्थनिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांच्या हत्येनंतर ते राहत असलेल्या लॅकेस्टर भागातील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. पटेल तेथील भारतीय समुदायाचे महत्त्वाचे सदस्य होते. हत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून, तपास सुरु असल्याचे तपास अधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात भिती व चिंतेचे वातावरण पसरले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काळात घडू लागलेल्या या घटनांबाबत भारतीय समुदाय तीव्र संतापही व्यक्त करत आहे. गौरेतर नागरिकांना सुरंक्षण देण्याची मागणीही पुढे येते आहे. ट्रम्प प्रशासनानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. वर्ण किंवा वंशभेदाला अमेरिकेत स्थान नाही. अशा प्रकारची दुष्कृत्ये करणार्यांना कडक शासन केले जाईल, असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.