सोनीपत। फ्रांसमध्ये होणार्या आगामी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी 15 कुस्तीपटूंचा समावेश असलेल्या फ्रिस्टाईल आणि ग्रिको रोमन प्रकारासाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. सोनीपतमधील साई केंद्रात झालेल्या निवड चाचणी शिबीरातून भारतीय संघाची निवड करण्यात आली. जागतिक स्पर्धा 21 ऑगस्टपासून फ्रांसमध्ये रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघ स्पेनमध्ये 15 आणि 16 जुलै रोजी होणार्या स्पर्धेत सहभागी होतील. भारताचे स्टार कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि सुशिलकुमार या चाचणीत सहभागी झाले नाहीत. बजरंग पुनिया आजारी असल्यामुळे 65 किलो गटाची चाचणी घेण्यात आली नाही. ही चाचणी आता 13 जुलै रोजी होणार आहे. बजरंगची लढत राहुल मानशी होणार आहे. सुशीलकुामर या निवड चाचणीत सहभागी झाला नसला तरी क्रीडा मंत्रालयाचा निरिक्शक या नात्याने तो चाचणीसाठी उपस्थित होता. याशिवाय भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंग, मुख्य मार्गदर्शक कुलदीप सिंग, मार्गदर्शक विरेंद्र मलिक, जगमेंद्र सिंग यावेळी हजर होते.
फूटेज पाहून निवड
या निवड चाचणीत 59 ते 130 किलो गटातील कुस्तीपटू सहभागी झाले होते. ग्रिको रोमन प्रकारातील 130 किलो गटाच्या लढतीचा निर्णय व्हिडीओ फूटेज पाहून घेण्यात आला. या गटात नविन आणि मेहर सिंग यांच्यातील लढत चांगलीच रंगली. निर्णय देण्यासाठी पंचानी ही लढत मध्येच थांबवून त्याचे व्हिडीओ फूटेज पाहिले. त्यानंतर नविनच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
तीन पदके जिंकू
2015 मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताची पदकाची पाटी कोरी राहिली होती. मात्र यावेळी किमान तीन पदके जिंकू असा विश्वास मुख्य मार्गदर्शक कुलदीप सिंग यांनी व्यक्त केला. कुलदीप सिंग म्हणाले की, कुस्तीपटूंनी स्पर्धेकरता चांगली तयारी केली आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेत चांगली कामगिरी होईल. यावेळी किमान तीन पदके तरी जिंकू.
भारतीय संघ असा
फ्रि स्टाईल : संदीप तोमर (57 किलो), हरफूल (61 किलो), अमित धनखड (70 किलो), प्रविण राणा (74 किलो), दीपक (86 किलो), सत्यव्रत कादियान (97 किलो), सुमित सांगवान (125 किलो).ग्रिको रोमन : द्यानेंद्र (59 किलो), रवींद्र (65 किलो), योगेश (72 किलो), गुरप्रीत सिंग (75 किलो), हरप्रीत (80 किलो), रवींद्र खत्री (85 किलो), हरदीप (98 किलो), नविन (100 किलो).