भारतीय क्रिकेट संघाला धक्का; रोहित शर्मा वनडेला मुकणार

0

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला न्युझीलंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सामन्याआधी धक्का बसला असून, सलामीचा फलंदाज रोहित शर्मा वन डे सामन्याला मुकणार आहे. रोहितच्या जागी मयांक अग्रवालची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला फलंदाजी करताना मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी देखील आला नाही. त्याच्या ऐवजी केएल राहुलने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती.

बीसीसीआयने आज न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघासाठीची घोषणा केली. कसोटी संघात रोहितच्या जागी शुभमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे. धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉला देखील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. मयांक अग्रवाल याला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. तो राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्यासह तिसरा सलामीचा फलंदाज असेल. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत शिखर धवनला दुखापत झाली होते तेव्हा मयांकनेच सलामीचा फलंदाज म्हणून भूमिका पार पाडली होती.

हिटमॅन रोहित शर्माच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. २०१९मध्ये रोहितने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये त्याने दोन षटकार मारून विजय मिळवून दिला होता. तर अखेरच्या सामन्यात नाबाद ६० धावा केल्या होत्या. हिटमॅन रोहित शर्माच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.