कन्नूर । केरळमधील सीपीएमचे सचिव कोदीयेरी बालकृष्णन यांनी भारतीय लष्कराबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. बालकृष्णन यांनी लष्करावर अपहरण आणि बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत. लष्कराला जास्त अधिकार दिले तर, ते कोणाबरोबर काहीही करू शकतात. लष्कर महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करेल. लष्कराला कन्नूर येथे तैनात केले तर, येथील जनतेबरोबर त्यांचा संघर्ष अटळ आहे, अशी विधान त्यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना केली आहेत.
दरम्यान, चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र पाहिले तर, लष्कर त्यांच्यावर सरळ गोळीबार करते. कोणलाही त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, अशी वादग्रस्त विधाने त्यांनी केली आहेत. या विधानांबद्दल कोदीयेरी यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरू झाली आहे. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच युद्धासारख्या परिस्थितीत लष्करी अधिकार्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे असे विधान केले होते. याच विधानाच्या पार्श्वभूमीवर बालकृष्णन यांनी ही विधाने केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या वादग्रस्त विधानांमुळे पक्षीय पातळीवर बालकृष्णन यांच्यावर कोणती कारवाई होते का, हे पहावे लागणार आहे.