श्रीनगर। पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. पाकच्या बॅट पथकाने शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता टेहळणी करणार्या भारतीय जवानांच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात बॅटचे दोन जवान मारले गेले. बॅटचे जवान झेलम नदीच्या दक्शिण तटाजवळ नियंत्रण रेषा पार करून सुमारे 700 मीटर आत आले होते. भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिल्यावर हे हल्लेखोर पुन्हा पाकिस्तानी चौकीच्या दिशेने पळायला लागले होते. त्यानंतर नियंत्रण रेषेच्या आत 200 मीटरवर भारतीय सैन्याने दोन जवानांचा खात्मा केला. ठार करण्यात आलेल्या हल्लेखोरांकडून एक एके 47 रायफल, एक पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा सापडला. या दोघांबरोबर आणखी दोन हल्लेखोर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या दोन्ही हल्लेखोरांनी पठाणी सूट आणि शाल परिधान केली होती. 1 मे रोजी पाकिस्तानच्या बॅट पथकाने भारतीय सीमेत 250 मीटर आतमध्ये घुसखोरी केली होती. त्यावेळी त्या पथकाने दोघा भारतीय जवानांचे शिर धडावेगळे केले होते. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर त्यांनी कट रचून टेहळणी करणार्या भारतीय जवानांची हत्या केली होती. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून बॅटचा वापर केला जातो. त्यानंतर भारतीय जवानांनी या भागात शोधमोहीम तीव्र केली आहे.
बॅटच्या कारवाया
22 नोव्हेंबर 2016 रोजी नियंत्रण रेषेजवळ, माछिल येथे पाकिस्तानच्या अतिरेकी हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले होते. त्यावेळी एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. माछिलमध्ये भारतीय जवान कुंपणाच्या पुढच्या भागातून गस्त घालतात. गेल्यावर्षी 28 ऑक्टोबर रोजी मनदीप सिंग या जवानाच्या मृतदेहाची पाकिस्तानी सैन्याने विटंबना केली होती. पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या कव्हर फायरिंगचा फायदा उचलत दहशतवाद्यांनी घुसखोरी करताना केलेल्या हल्ल्यात एक भारतीय जवान शहीद झाला होता. या जवानाचा मृतदेह नंतर अत्यंत वाईट अवस्थेत सापडला होता. ही घटनाही माछिलमध्ये घडली होती.
2013 मध्ये लान्सनायक हेमराज आणि सुधाकरसिंग यांच्या मृतदेहाचीही पाकिस्तानी सैन्याने विटंबना केली होती. जून 2008 मध्ये पाकिस्तानच्या बॅट पथकाने गोरखा रायफल्सच्या एका जवानाला पकडले होते. काही दिवसांनी त्या जवानाचे शिर धडावेगळे करून त्याचा मृतदेह भारतीय हद्दीत फेकून दिला होता. सन 1999 मध्ये कारगिल युद्धच्या वेळीस कॅप्टन सौरभ कालिया यांचाही पाकिस्तानी सुरुवातीला छळ केला त्यानंतर त्यांनी कालिया यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. पाकिस्तानने 2016 मध्ये नियंत्रण रेषेजवळ 228 वेळा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 221 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
बॉर्डर अॅक्शन टीम
बॉर्डर अॅक्शन टीम हे पाकिस्तानच्या बॅट पथकाचे पूर्ण नाव आहे. या पथकाबद्दल 5 – 6 ऑगस्ट 2013 दरम्यान भारतीय सैन्याला माहिती मिळाली. त्यावेळी रात्री गस्त घालणार्या भारतीय जवानांवर या पथकाने हल्ला केला होता. पाकिस्तानच्या स्पेशल फोर्ससाठी तयार करण्यात सैनिकांचे हे पथक आहे. विशेष म्हणजे सैनिकी प्रशिक्षण मिळालेले दहशतवाद्यांचाही या पथकात समावेश आहे. पाकिस्तानी रेंजर्स, लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदचे दहशतवादी आणि खाटीक असे 10 ते 12 जणा बॅटच्या प्रत्येक पथकात असतात. जबाबदारी सोपवल्यावर हे पथक संबंधित क्षेत्रात अनेकदा कारवाई करते. भारतीय सीमेत साधारणपणे 20 ते 25 मीटर आत घुसून सापळा रचून भारतीय जवानांवर हल्ला करून लगेच परत जाते. ही कारवाई अगदी 10 ते 15 मिनिटांची असते.