भारतीय नागरीक एकसंघ ठेवण्याची काळजी सरकारने घ्यावी

0

बोदवड। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले हे सांगण्याऐवजी आपण बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काय मदत करु शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. भाजपाचे सरकार आल्यापासून देशात बौध्द, मुस्लिम, मागासवर्गीयांवर जास्त हल्ले होत आहे. सरकार राज्य घटनेनुसार काम करीत नसून आरएसएसच्या धोरणानुसार काम करीत आहे. गोवंश संरक्षणासाठी आधीच राज्य घटनेत नमूद केले आहे. कोणत्या धर्माच्या लोकांनी काय खावे, काय प्यावे यावर बंधने घालणे चुकीचे असून भारतीय नागरीक एकमेकांपासून दुभंगणार नाही याची काळजी घेणे सरकारचे काम आहे, असे प्रतिपादन भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय संघटक धम्मदूत डी.एस. तायडे यांनी केले. ते भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय व शहर शाखा कार्यकारिणीच्या पुनर्गठन करणे सभेत बोलत होते.

सभेस यांची होती उपस्थिती
सभेसाठी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष के.वाय. सुरवाडे, कोषाध्यक्ष सुधाकर सपकाळे, मनूद खुर्द शाखाध्यक्ष सागर तायडे, के.एस. सुरवाडे, चैतराम सुरळकर, वामन निकम, पी.एन. प्रधान, बाजीराव बोदडे, बी.ओ. इंगळे, प्रेम तायडे, आकाश तायडे, मंगेश तायडे यांची उपस्थिती होती. पदाधिकार्‍यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

विविध विषयांवर चर्चा
या सभेत भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा व शहर शाखाध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणी पुनर्गठन करणे, तालुक्यात प्रचार व प्रसारासाठी बौध्द बांधवांच्या सामाजिक कल्याणासाठी फंडाची निर्मिती करणे, आषाढ पौर्णिमेपासून संपूर्ण तालुक्यात वर्षावासानिर्मित बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन करणे, बुध्दगया पर्यटनासाठी पर्यटक पाठविणे, आंबेडकरी चळवळीचे पाक्षिक प्रबुध्द भारत व धम्मयानचे वार्षिक वर्गणीदार सभासद करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

झोकून देत कार्य करा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष बी.के. बोदडे हे होते. त्यांनी कार्यकर्त्यांना संघटनेसाठी एकदिलाने झोकून देत कार्य करण्याचे आवाहन केले.