भोपाळ: संरक्षण क्षेत्रातील भारताची ताकत दिवसेंदिवस वाढत आहे. आज ‘देशी बोफोर्स’ धनुष तोफांची पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल झाली. मध्य प्रदेशात जबलपूर येथे झालेल्या कार्यक्रमात धनुष तोफा लष्कराकडे सुपूर्द करण्यात आल्या. चीन आणि पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमेवर धनुष तोफांची तैनाती करण्यात येणार आहे. धनुष ही भारतात निर्मिती करण्यात आलेली पहिली स्वदेशी बनावटीची तोफ आहे.
बोफोर्स तोफांच्या धर्तीवर धनुषची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणून धनुषला देशी बोफोर्स म्हटले आहे. १९९९ सालच्या कारगिल युद्धात पाकिस्तानी पोस्टना लक्ष्य करण्यात बोफोर्स तोफांनी महत्वाची भूमिका बजावली होती. धनुष बोफोर्सप्रमाणे १५५ एमएम कॅलिबरची तोफ आहे. धनुष ही विश्वसनीय, मजबूत आणि जगातील अन्य तोफांच्या तोडीची तोफ आहे. धनुषमुळे भारतीय सैन्यदलाच्या शत्रूवर प्रहार करण्याच्या क्षमतेमध्ये कैकपटीने वाढ होणार आहे. ही तोफ खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ आहे असे अधिकाऱ्याने सांगितले. १८ फेब्रुवारीला ओएफबीला ११४ धनुष तोफांची निर्मिती करण्याला मंजुरी मिळाली. जीसीएफने सहा धनुष तोफा भारतीय लष्कराकडे सुपूर्द केल्या.