नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे २१ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना मुंबईस्थित नेव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अगोदर भारतीय लष्करातील ८ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २१ जवानांना मुंबईतील नेव्ही रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. यात ‘आयएनएस आंग्रे’ या नौदलाच्या प्रशासकीय तळावर आढळलेल्या २० करोनाबाधित जवानांचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे, या जवानांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नव्हती. हे जवान ७ एप्रिल रोजी आढळलेल्या एकाच कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. ‘आयएनएस आंग्रे’मध्ये हे सर्व जवान एकाच ठिकाणी राहत होते. नौदलाच्या कोणत्याही जहाज किंंवा पानबुडीवर तैनात जवानांमध्ये अद्याप कोरोनाची लागण झाली नसल्याचे नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.