येरुशलम । भारतीय नौदल आपल्या चार जहाजांसाठी इस्त्रायकडून मिसाईल आणि संरक्षण प्रणालीची खरेदी करणार आहे. त्यासाठी सुमारे चार हजार कोटींचा करार करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात भारत आणि इस्त्रायल यांच्यात संरक्षण सामग्रीच्या संदर्भात सुमारे 12 हजार कोटींचा करार झाला आहे. रविवारी करण्यात आलेला करार हा त्या कराराचा एक भाग असल्याची माहिती इस्त्रायल अॅरोस्पेस इंड्रस्ट्रिजने दिली. इस्त्रायलच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणार्या बराक 8 मिसाईलची मागील आठवड्यात भारतीय जहाजावर यशस्वी चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान इंटरसेप्टीव्ह मिसाईल डागून लक्ष्य भेद करण्यात आला. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या मेक इन इंडिया पॉलिसीनुसार पहिल्यांदाच इस्त्रायल अॅरोस्पेस इंड्रस्ट्रिजला काम देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात इस्त्रायलचा दौरा करणार आहेत. त्याआधी दोन्ही देशांमधील संबंध दृढ होण्याकरिता हा करार करण्यात आला आहे.
भारताचा तिसरा क्रमांक
इस्त्रायलकडून संरक्षण सामुग्री खरेदी करणार्या देशांमध्ये भारत तिसर्या क्रमाकांवर आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये इस्त्रायलने भारताशी 10 अब्ज डॉलर्सचे करार केले आहेत. मागील दोन वर्षांमध्ये इस्त्रायलने हत्यारे पुरवण्यासाठी भारताशी सात करार केले आहेत. याशिवाय आणखी मोठे करार होणार आहेत. त्यात इस्त्रायलमध्ये तयार करण्यात आलेल्या दोन फाल्कन अॅवॉक्स प्रणालींचा समावेश आहे. या प्रणाली रशियाकडून मिळणार्या आयएल- 76 या लढाऊ विमानांवर बसवण्यात येणार आहेत. भारत इस्त्रायलकडून चार अॅरोस्टॅट रडार आणि हल्ला करणार्या ड्रोन्सची खरेदी करणार आहे. भारताने याआधी इस्त्रायलकडून अशी 100 ड्रोन्स खरेदी केले आहेत.
काय आहे बराक-8
बराक-8 मध्ये एमएफ- स्टार (मल्टीफंक्शन सर्विलांस अँड थ्रेट अलर्ट राडार) लावण्यात आली आहे. या मिसाईलची डाटा लिंक वेपन सिस्टीम 100 किलोमीटरपर्यंत शत्रूचा ठावठिकाणा शोधून 70 किलोमीटरपर्यंतच्या कक्षेत त्याचा खात्मा करते. जाणकारांच्या मतानुसार या प्रणालीमुळे भारताच्या हवाई सुरक्षांमध्ये असलेल्या त्रुटी भरून काढल्या जातील. बराक-8 च्या समावेशामुळे भारताचे हवाई दल आणखीन मजबूत होईल.