नवी दिल्ली । कारकीर्द धोक्यात आणू शकणा़र्या दुखापतीतून सावरल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणे सोपे नसते. त्यामुळेच पुढील महिन्यात होणा़र्या कसोटी मालिकेत द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन भारतासाठी फारसा धोकादायक ठरू शकणार नाही, असे भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगला वाटते. गेल्या वषी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यावेळी स्टेनच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो सुमारे वर्षभर स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिला होता. स्टेन गेल्या दशकातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे, यात कोणताच संशय नाही. पण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पुनरागमन करणे सोपे नसते. झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटीत तो खेळणार असला तरी तशी कामगिरी तो भारताविरुद्धही करू शकेल, असे मानता येणार नाही.
भारताकडे भक्कम फलंदाजीची फळी असून मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, कोहली, अजिंक्मय रहाणे, रोहित शर्मा यासारखे दर्जेदार खेळाडू या संघात आहेत. त्यामुळेच जगातील सर्वोत्तम फलंदाजांची लाईनअप भारताकडे असल्याचे मानले जाते. स्टेन व मॉर्कल दोघांसमोर या सर्वोत्तम लाईनअपला रोखण्याचे आव्हान असेल, विशेषतः त्यांना गोलंदाजीची लय सापडेपर्यंत, असे हरभजन म्हणाला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टयांवर चेंडू स्विंग होत नाहीत. त्यामुळे फलंदाजांना मुख्यता उसळत्या चेंडूशीच मुकाबला करावा लागणार आहे. कोकाबुरा चेंडू 20 षटकांनंतर सीम होऊ शकत नाही. त्यामुळे फक्त बाऊन्सला व्यवस्थित सामोरे जाता आले तर फलंदाजांना ते पुरेसे ठरेल, असेही भज्जी म्हणाला. हार्दिक पंडयाकडे अष्टपैलुत्वाचे गुण असल्याने सहाव्या क्रमांकावर त्याला खेळवले जावे का, असा वाद सुरू आहे. पण हरभजनचे या संदर्भातील मत वेगळे आहे. हार्दिक फलंदाज म्हणून या महत्त्वाच्या जागेवर कशी कामगिरी करणार, याची अजून खात्री नसल्याने रोहित शर्माला त्या जागेवर खेळविले जावे, असे हरभजनला वाटते. रोहित उत्तम खेळाडू असून तो पुल व कटचे फटके चांगल्या पद्धतीने खेळतो.